पुणे – कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 50.06 टक्के मतदान झाले. मतदान प्रकियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसून, सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. कसब्यात सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढल्याचे दिसून आले.
कसबा विधानसभेच्या निवडणुकीत 16 उमेदवार रिंगणात होते. मात्र भाजपचे हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये लढत आहे. या सर्व उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रामध्ये बंद झाले. दरम्यान, मतमोजणी गुरुवारी (दि. 2) होणार आहे.
#कसबापेठ विधानसभा मतदारसंघात ५०.०६ टक्के मतदान pic.twitter.com/MtAJdLGW8U
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) February 26, 2023
कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. राज्यात सत्तांतर होऊन शिंदे -फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडी विरुध्द भाजप अशी थेट निवडणूक होत आहे. त्यामुळे ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली. सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली. काही मतदान केंद्रांवर रांगोळ्या, मतदारांना गुलाब पुष्प देऊन स्वागत, फुग्यांची सजावट, रेड कार्पेट, सनईचा सूर अशा मंगलमय वातावरणात मतदान पार पडले.
सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. सकाळी सात ते नऊ या पहिल्या दोन तासांत 6.5 टक्के मतदारांनी मतदान केले. यानंतर 11 पर्यंत संथ गतीने मतदान सुरू होते. 11 वाजेपर्यंत 8.25 टक्के इतके मतदान झाले होते. दुपारनंतर मात्र मतदानावर गर्दी होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून आले. भर दुपारीसुध्दा मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत #कसबापेठ विधानसभा मतदारसंघात टक्के ४५.२५ आणि #चिंचवड मतदारसंघात ४१.१० आणि टक्के मतदान pic.twitter.com/2Ut4ZHZMlK
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) February 26, 2023
दुपारी एक पर्यंत 18.5 टक्के तर तीन वाजेपर्यंत कसब्यात 30.05 टक्के मतदान झाले. तर तीन ते पाच या वेळेत 45.25 टक्के मतदान झाले. दुपारनंतर भवानी पेठ, टिंबर मार्केट, गंज पेठ या पेठांच्या परिसरात मतदान केंद्रांवर गर्दी झाली होती. कसब्यात नऊ मतदान केंद्र संवेदनशील होती. या मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान उपस्थित होते.
मतदानापूर्वी मॉक पोल
मतदान सुरु होण्याआधी एक तास मॉक पोल घेण्यात येतो. मॉक पोल सुरू होण्याची आधी 2 व्हीव्हीपॅट आणि एक कंट्रोल युनिटमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली. ही मशिन अवघ्या 15 मिनिटांत बदलण्यात आली. एकूण मतदान यंत्राच्या सुमारे 40 टक्के मशिन जिल्हा प्रशासनाकडून राखीव ठेवण्यात आल्या होत्या.