पुणे -फिरोदिया करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत “बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालया’च्या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले. अंतीम फेरीचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक “सर परशुरामभाऊ महाविद्यालया’च्या संघाने, तर तृतीय क्रमांक आकुर्डीच्या “डॉ. डी. वाय. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालया’च्या संघाने पटकावला.
निकाल जाहीर झाल्यानंतर स्पर्धकांनी नाट्यगृहाबाहेर जल्लोष केला. सामाजिक आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमी निर्मित आणि एचसीएल फाउंडेशन यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचे हे 49 वे वर्ष आहे. स्पर्धेची अंतिम फेरी सातारा रस्त्यावरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात शनिवारी आणि रविवारी तीन सत्रांत झाली.
प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या एकूण नऊ संघांनी अंतिम फेरीत सादरीकरण केले होते. यामध्ये प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या महाविद्यालयांसह “पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय’, “सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय’, “महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’, “जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय’, “राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय’ आणि “फर्गसन महाविद्यालय’ यांचा समावेश होता. अंतिम फेरीसाठी विनोद लवेकर, संदीप पाठक, चिन्मयी सुमित आणि मुग्धा गोडबोले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.