पुणे : चुकीच्या ई-चलनांचे ‘ट्रॅफिक’!

पुणे, (संजय कडू) –चुकीच्या ई-चलनाबाबत वाहतूक शाखेकडे मागील दहा महिन्यांत तब्बल 8 हजार 200 तक्रारी आल्या आहेत. नियमभंग न करणाऱ्या वाहनचालकांनाही दंडाचे चलन पाठवले गेले आहे. संबंधित नागरिकांनी वाहतूक शाखेशी संपर्क साधल्यावर त्यांच्या वाहनावरील दंड कमी केला गेला. दरम्यान, यात काही “बहाद्दर’ वाहनचालक “आयडिया’ लढवत असल्याने काही प्रामाणिक नागरिकांना जाच होत आहे. दरम्यान, शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता, पोलिसांनी तिकडे लक्ष देण्याऐवजी दंड आकारणीवर लक्ष दिल्याची तक्रारही काही वाहनचालक करत आहेत.

वाहतूक पोलिसांनी लावलेला दंड टाळण्यासाठी स्कूटरच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी एका व्यक्‍तीवर खडक पोलिसांनी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकारे अनेक जण कारवाई टाळण्यासाठी नंबर प्लेटमध्ये छेडछाड करत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. सीसीटीव्हीव्दारे होणारा दंड आपल्या वाहनाला बसू नये, म्हणून अनेकजण वाहन क्रमांकात बदल करतात (क्रमांक जोडून किंवा हटवून). हे ई-चलन चुकीच्या पद्धतीने देण्यामागील एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे इतर वाहनचालक आणि पोलिसांची गैरसोय होत आहे.

असा ठोठावला जातो दंड

शहर वाहतूक पोलिसांनी यावर्षी दि.1 जानेवारी ते 31 ऑक्‍टोबरदरम्यान सीसीटीव्हीचा वापर करून तब्बल 17.78 लाख ई-चलन जारी केली आहेत. वाहतूक नियम तोडणाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी शहरात 1,200 सीसीटीव्ही बसवले आहेत. हे कॅमेरे कंट्रोल रूमशी थेट जोडले गेलेले आहेत. वाहतूक पोलिसांचे पथक नियमितपणे स्क्रीनवर लक्ष ठेवून असते. वाहतुकीचे नियम कोणीही मोडताच, वाहतूक पोलीस त्याचा स्क्रीनशॉट घेतात. गाडीच्या नंबर प्लेटवरून गाडीच्या मालकाची माहिती काढली जाते. त्याने वाहन नोंदणीवेळी दिलेल्या मोबाइल नंबरवर ई-चलन पाठवले जाते. ही ऑनलाइन प्रणाली सॉफ्टवेअरशी जोडलेली आहे. एका फॉर्ममध्ये ज्या ठिकाणी वाहतूक नियमभंगाचा गुन्हा घडला आहे, त्या भागाची प्रतिमा आणि इतर तपशील आणि वेळ दिलेली असते. त्यानंतर ऑनलाइन चलन तयार होते आणि संबंधित मोबाइल क्रमांकावर मेसेज पाठवला जातो. फोन नंबर जोडलेला नसल्यास वाहतूक पोलीस रस्त्यावर वाहन आढळल्यास कारवाई करतात.

म्हणून..चुकीचे चलन

अनेकदा दुचाकी चालकाचा हेल्मेटचा दंड चारचाकी वाहनांना ई-चलनाद्वारे पाठवला जातो. दुचाकीचा खाडाखोड केलेला क्रमांक एखाद्या चारचाकी वाहनाशी जुळत असेल, तर असे प्रकार घडतात, असा दावा पोलीस करत आहेत.

“कारवाईपासून वाचण्यासाठी अनेक वाहनचालक वेगवेगळ्या युक्‍त्या वापरून त्यांच्या वाहनांच्या नोंदणी क्रमांकात बदल करतात. अशा छेडछाडीशिवाय, वर्षानुवर्षे खराब झालेल्या/जीर्ण झालेल्या नंबर प्लेट्‌स, फॅन्सी नंबर प्लेट्‌सचा वापर, नंबरप्लेटवरील चुका आणि इतर कारणेदेखील आहेत. आम्ही अशा तक्रारींची पडताळणी करतो आणि चुकीच्या पद्धतीने चलन जारी केल्याचे आढळल्यास ते हटवतो. प्रथम चलनाशी जोडलेली प्रतिमा तपासली जाते. ती जर ती चित्र पीडित व्यक्तीच्या वाहनाशी जुळत नसेल, तर वाहतूक पोलीस चलनाची लिंक हटवतात.
– राहुल श्रीरामे
उपायुक्त, वाहतूक शाखा

चुकीच्या चलनाची कारणे
*क्रमांक बदलून किंवा मालिका तपशील बदलून वाहनाच्या नंबर प्लेटमध्ये बदल
*ज्यांचे क्रमांक किंवा मालिका तपशील दिशाभूल करणारे आहेत, अशा फॅन्सी नंबर प्लेट्‌स बसवणे
*नियंत्रण कक्षातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या टायपिंगच्या चुका
*नंबर प्लेटवर चिखल लावणे
*जीर्ण, अस्वच्छ नंबर प्लेट वापरणे

पोलिसांनी जारी केलेली ऑनलाइन चलन  17.78 लाख
एकूण तक्रारी प्राप्त झाल्या     8,200
शहरातील सीसीटीव्हींची संख्या    1,200

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.