पुणे : शिवाजीनगर, कर्वेनगर, भोसरी सर्वाधिक प्रदूषित

पुणे (गायत्री वाजपेयी)- राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत (एन-कॅप) घेतल्या जाणाऱ्या हवा प्रदूषणाच्या नोंदींच्या आधारे शहरात हवेच्या प्रदूषणाचे तीन हॉटस्पॉट निश्‍चित करण्यात आले आहेत. यात शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या शिवाजीनगर येथे सर्वाधिक हवा प्रदूषण होत असल्याची धक्‍कादायक माहिती या नोंदीतून समोर आली आहे. दरम्यान, कर्वेनगर, भोसरी परिसरदेखील याच रांगेत असून, नागरिकांना शुद्ध हवेसाठी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरतही प्रदूषण वाढले आहे. “एन-कॅप’ कार्यक्रमांतर्गत देशभरातील काही निवडक शहरांत हवेच्या सातत्याने नोंदी घेण्यात येत आहेत. यासाठी “एन-कॅप ट्रॅकर’ संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. हवा प्रदूषणासंदर्भातील विविध घटकांचे माहितीफलक यावर उपलब्ध आहेत. त्यानुसार देशात सर्वाधिक प्रदूषित ठिकांणांचा समावेश हा “हॉटस्पॉट’ म्हणून करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पुण्यातील शिवाजीनगर, कर्वे रस्ता आणि भोसरी ही तीन ठिकाणे प्रदूषणाचे “हॉटस्पॉट’ ठरले आहेत. याठिकाणी पीएम 2.5 या प्रदूषकाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे नोंदीतून समोर आले आहे. त्याचबरोबर “पीएम 10′ या प्रदूषकाचेही प्रमाण धोकादायक स्तरावर असल्याचे या नोंदीतून समोर आले आहे. प्रदूषणाच्या नोंदीनुसार, शिवाजीनगर येथे “पीएम 2.5′ या हानिकारक प्रदूषकाचे प्रमाण 142 प्रती क्‍युबिक घनमीटर इतके नोंदविण्यात आले. तर कर्वेनगर येथे 83 प्रती क्‍युबिक घनमीटर आणि भोसरी येथे हे प्रमाण 121 प्रती क्‍युबिक घनमीटर इतके नोंदविण्यात आले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरविलेल्या 80 प्रती क्‍युबिक घनमीटर या प्रमाण मर्यादेपेक्षा हवेतील प्रदूषकाची मात्रा अधिक असल्याने या ठिकाणांवरील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळत असल्याचे दिसून आले आहे.

शहरातील हवेच्या प्रदूषणाचे प्रमुख स्रोत हे वाहनांचे उत्सर्जन, धूलिकण, बांधकाम व्यवसाय हे आहेत. अशावेळी हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण आणि “एन-कॅप’ प्रोगॅमची अंमलबजावणी ही पूर्णपणे पुणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळातर्फे अद्याप याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
– प्रताप जगताप
उपप्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी

काय आहे एन-कॅप प्रोग्रॅम?
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम हा केंद्र सरकारच्या धोरणांतील एक प्रमुख कार्यक्रम आहे. जानेवारी 2019 मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमांतर्गत देशातील 122 शहरांमधील “पीएम’ अर्थात पर्टिक्‍युलेट मॅटर या प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण 20 ते 30 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. याअंतर्गत देशात हवा प्रदूषण मोजणी केंद्रांची संख्या वाढविणे, नवीन तंत्रज्ञानाच्या सहायाने हवा प्रदूषणाचे व्यवस्थापन, जागरूकता, उपाययोजना राबविणे यासारखी कामे नियोजित करण्यात आली आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.