पुणे – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागात उभारण्यात येत असलेल्या पर्यायी रस्ताच्या दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्याच्या कामाने वेग घेतला आहे. यातील एका बोगद्याचे काम सुमारे 70 टक्के पूर्ण झाले आहे. येत्या डिसेंबरअखेरपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट “एमएसआरडीसी’ने ठेवले आहे. या प्रकल्पामुळे पुणे- मुंबई हे अंतर 6 किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे प्रवासात 25 मिनिटांची बचत होणार आहे.
मुंबई पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे दोन्ही कॉरिडॉरची देखभाल, दुरुस्तीसाठी बीओटी (बांधा, वापरा व हस्तांतरीत करा) या तत्त्वावर 30 वर्षांच्या कालावधीसाठी राज्य सरकारने 1999 पासून “एमएसआरडीसी’कडे हस्तांतरित केला आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट ही रुंदी सहा पदरी असून या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते. तसेच भागामध्ये घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यत बंद ठेवावी लागते. या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 कि.मी च्या राहिलेल्या मिसिंग लिंकचे काम हाती घेण्यात आले.
या प्रकल्पामुळे बोर घाटातील 6 किलोमीटर वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. लोणावळापासून सुरू होणारा हा बोगदा पुढे खोपोली एक्झिट येथे संपणार आहे. 2019 मध्ये या कामास सुरुवात झाली आहे. करोनाच्या काळात काही महिने काम बंद होते. त्यानंतर हे काम वेगाने सुरू करण्यात आले. पुण्याकडून मुंबईला जाताना असणारा बोगदा हा सुमारे 9 किलोमीटर लांबीचा असून यातील साडेसहा किलोमीटर लांबीच्या बोगदाचे खोदकाम पूर्ण झाले आहे, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.