मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना रविवारी उमेदवारी जाहीर केली. या घोषणेबरोबरच मागील काही महिन्यांपासून सातत्याने महाविकास आघाडीविरोधात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन टीकेची झोड उठवणारे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांची फिरकी घेतली.
किरीट सोमय्यांचा एक हसरा फोटो ट्विट करत अमोल मिटकरींनी त्यांच्यावर उपहासात्मक टीका केली. “तथ्यहिन घोटाळे बाहेर काढताना रात्रंदिवस घसा ओरडुन ओरडुन रोज पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता नाराज झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे,” अशा कॅप्शनसहीत हा फोटो मिटकरींनी ट्विट केले आहे.
तथ्यहिन घोटाळे बाहेर काढताना रात्रंदिवस घसा ओरडुन ओरडुन रोज पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता नाराज झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे . pic.twitter.com/33tqinSTct
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 29, 2022
दरम्यान, भाजपाने तिसरा उमेदवार रिंगणात उतरवल्याने शिवसेनेला दुसरा उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान असेल. भाजपाचे गोयल यांच्यासह डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि डॉ. विवेक महात्मे हे तीन खासदार निवृत्त होत आहेत. गोयल यांना तिसऱ्यांदा राज्यसभेसाठी संधी देण्यात आली. सहस्त्रबुद्धे आणि डॉ. महात्मे यांना भाजपने फेरउमेदवारी देण्यात आलेली नाही. यापैकी डॉ. सहस्त्रबुद्धे हे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आहेत. यामुळे नवी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात त्यांचे स्थान कायम राहिल.
भाजपाने दुसऱ्या जागेसाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शीचे माजी आमदार डॉ. अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली आहे. डॉ. बोंडे हे २००९ मध्ये अपक्ष तर २०१४ मध्ये भाजपच्या वतीने विधानसभेवर निवडून आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. भाजपाच्या कृषी विभागाचे ते अध्यक्ष आहेत. आक्रमक अशी प्रतिमा असलेले डॉ. बोंडे हे गेले दोन वर्षे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नेहमी आक्रमकपणे बोलत असतात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. कुणबी समाजातील डॉ. बोंडे यांना उमेदवारी देऊन भाजपने ओबीसी समाजाचे कार्ड वापरले आहे.