पुणे – भरधाव टेम्पोचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी खाली पडून झालेल्या अपघातात महिला ठार झाली आहे. त्याशिवाय पती जखमी झाले आहेत. हा अपघात १५ जूनला सकाळी सातच्या सुमारास नऱ्हे परिसरातील रस्त्यावर घडला.
याप्रकरणी टेम्पोचालक गोविंद सिंग (वय ४३, रा. उत्तरप्रदेश ) याला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. बबीता लुंबाराम सुतार (वय ५२) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा अर्जुन सुतार (वय ३६, रा. आंबेगाव) यांनी तक्रार दिली आहे.
लुंबाराम आणि बबीता सुतार काल सकाळी पावणेसातच्या सुमारास दुचाकीवरून आंबेगावला निघाले होते. त्यावेळी नवले ब्रीज परिसरात साताऱ्याकडे चाललेल्या टेम्पो चालकाने लुंबाराम यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे खाली पडल्यामुळे लुंबाराम जखमी झाले. त्याशिवाय त्यांची पत्नी बबीता गंभीररित्या जखमी होउन मृत्यूमुखी पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे तपास करीत आहेत.