पुणे – खोदाई केलेले रस्ते 7 जूनपर्यंत पूर्ववत करणार?

पुणे – महापालिकेने विविध केबल कंपन्यांना खोदाईला दिलेली परवानगी 30 एप्रिललाच संपली असून हे रस्ते पूर्ववत करण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. 7 जूनपर्यंत ते पूर्ववत करण्यात येतील, असा दावा महापालिकेच्या पथ विभागाकडून करण्यात आला आहे.

महापालिकेने केबल कंपन्यांना 150 किमी लांबीचे रस्ते खोदण्याला परवानगी दिली होती. त्यापैकी 115 किमी रस्त्याची खोदाई झाली असून त्यातील 70 किमीचे रस्ते पूर्ववत केल्याचा दावाही संबंधित विभागाने केला आहे. उर्वरित रस्ते पावसाळ्यापूर्वी म्हणजे 7 जूनपर्यंत पूर्ववत करणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे.

महापालिकेने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल), भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल), टाटा कम्युनिकेशन, टाटा टेलिकॉम, आयडिया सेल्युलर, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) गिगा सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड, रिलायन्स, यू ब्रॉडबॅंड आणि केबल्स इंडिया प्राइवेट लिमिटेड, ह्यूजेस टेलीकॉम लिमिटेड, दिनेश अभियांत्रिकी प्रायव्हेट लिमिटेड, एअरटेल प्रायव्हेट लिमिटेड आणि व्होडाफोन या कंपन्यांना रस्ते खोदाईची परवानगी दिली आहे.

रस्ते खोदाईची परवानगी घेतलेल्या सर्व कंपन्यांना 30 एप्रिलपर्यंत खोदाई करण्याचे आदेश दिले आहेत. रस्ते खोदल्यानंतर तो भाग काम झाल्यानंतर पुन्हा पूर्ववत केला जातो. आम्ही विविध खासगी दूरसंचार कंपन्या, सरकारच्या वीज वितरण, पाईप गॅस आणि दूरसंचार कंपन्यांना यांना 150 किमी रस्ते खोदाईची परवानगी दिली होती. त्यावेळी संबंधित कंपन्यांकडून अनामत रक्‍कम ठेऊन घेण्यात येते. त्यांनी रस्ते पूर्ववत करणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांनी ते नाही केले तर अनामत रकमेतून ते काम केले जात असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.