मुलाखतीचे वेळापत्रक अद्यापही जाहीर न झाल्याने नाराजी
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहायक नगर रचनाकारपदासाठी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात परीक्षा घेतली होती. त्याचा निकाल लागून सात महिने झाले तरी मुलाखतीचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. उत्तीर्ण होऊनही मुलाखती न झाल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. आयोगाने लवकरात लवकर मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करावी, अशी मागणी उत्तीर्ण उमेदवारांतून होत आहे.
“सहायक नगर रचनाकार’ या पदांच्या 172 जागांसाठी आयोगाने 5 ऑगस्ट 2018 रोजी परीक्षा घेतली होती. आयोगाने या परीक्षेचा निकाल 15 ऑक्टोबर 2018 रोजी जाहीर केला. सुमारे 15 हजार उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यापुढील टप्पा मुलाखतीचा होता. त्यासाठी 598 जणांना पात्र ठरविण्यात आले. इतर परीक्षांचे निकाल लागून त्यांच्या पुढील प्रक्रियादेखील पूर्ण झाल्या आहेत; परंतु सहायक नगर रचनाकार या पदासाठी आयोगाने अद्याप मुलाखतीचे वेळापत्रक केलेला नाही. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना याबाबत वारंवार आयोगाकडे विचारणा करूनही मुलाखतीची निश्चित तारीख जाहीर करण्यास असमर्थता दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान होत असल्याची उमेदवारांची तक्रार आहे.
परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करताना त्याची विविध टप्प्याचे वेळापत्रक त्याचेळी जाहीर केले पाहिजे. त्यामुळे त्या तारखांना प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी आयोगाला करावी लागेल. तसे बंधनही अधिकाऱ्यांवर राहील. त्यामुळे उमेदवारांना वेळापत्रकाची वाट पाहावी लागणार नाही. योग्य वेळेत प्रक्रिया पूर्ण झाल्यास त्यातून आम्हाला दिलासा मिळेल, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. दरम्यान, मागील एक वर्षापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला अध्यक्ष व सदस्य नाहीत. त्यामुळे प्रभारी अध्यक्ष व एक सदस्य यांच्यावर आयोगाची पूर्ण जबाबदारी येत आहे. त्यामुळेच मुलाखतीस विलंब होत असल्याची प्रतिक्रिया उमेदवारांतून उमटत आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहायक नगर रचनाकारपदासाठी परीक्षा घेतली. पण अजूनही पास झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले नाही. निकाल लागून महिने झालेले असल्याने विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेकडे ही लक्ष देता येत नाही. त्यातून विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आयोगाने तातडीने मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करावी.
– किरण निंभोरे, उमेदवार