पुणे – ठेकेदाराला पैसे अदा करण्याला विरोध

चोवीस तास पाणीपुरवठा योजना : शुक्‍लकाष्ठ संपता संपेना

पुणे – चोवीस तास पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली असली तरी त्यामागचे शुक्‍लकाष्ठ संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे. संबंधित ठेकेदाराला काम पूर्ण होण्याआधीच 100 कोटी रुपये अदा करण्याला कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी विरोध केला आहे. निविदेतील आणि करारातील अटीशर्तींचा भंग करून ही रक्‍कम देण्यासंदर्भात ज्या अधिकाऱ्यांनी शिफारस केली आहे. त्यांच्यावरच कारवाई करण्याची शिंदे यांची मागणी आहे.

चोवीस तास पाणीपुरवठ्याचे काम एल ऍन्ड टी कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने पहिल्या टप्प्यातील पाईपलाईनचे काम करताना वितरण नलिका टाकणे, पाण्याच्या टाक्‍यांना पुरवठा करणाऱ्या मुख्य पाण्याच्या लाईन टाकणेसाठी पॅकेज एक ते सहा भागांमध्ये निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्यापैकी पॅकेज सहामध्ये 300 मि.मी. ते 1611 मि.मी. विविध व्यासाच्या 115 कि.मी. ट्रान्समिशन लाईन्स टाकण्यासाठी 261.92 कोटी रुपये रक्‍कमेची निविदा मागवण्यात आली आहे. या निविदेत पाईपचा पुरवठा करणे आणि खोदाई करून ते टाकणे असे विषय आहेत. पाईप टाकल्यानंतर ठेकेदारास बिले अदा करण्याचा विषय आहे. मात्र, त्यामध्ये काही अटीशर्तींचा समावेश आहे. त्यामध्ये ठराविक काम झाल्यानंतर बिले अदा करण्याचा विषय नमूद केला आहे, असे असतानाही ही रक्‍कम देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

महापालिकेकडे जागेची अडचण असल्याने हे पाईप एल ऍन्ड टी कंपनीने वाघोली आणि बालेवाडी येथे यार्डमध्ये ठेवले असून त्यांची शहानिशा सल्लागार कंपनीमार्फत महापालिकेने संयुक्‍तरित्या केली आहे. त्यामुळे त्या ठेकेदाराने 70 टक्‍के पाईपच्या रक्‍कमेची मागणी केली आहे. ती त्यांना अदा करावी, असे पत्र पाणीपुरवठा विभागाने दिले आहे. हे पत्रच नियमांच्या विरुद्ध असून ज्यांनी ही शिफारस केली आहे, त्यांच्यावरच कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here