पुणे – विसर्जन मिरवणूक किती वेळेत संपवायची, याचे कोणतेही निर्बंध नाही. त्यामुळे यंदाची मिरवणूक कमी वेळेत संपणार की लांबणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये सर्वांत कमी वेळेत विसर्जन मिरवणूक पार पडली. मात्र, यंदा रेकॉर्ड ब्रेक मिरवणूक होईल आणि आतापर्यंतच्या वेळेचे सर्व रेकॉर्ड मोडले जातील, असेही बोलले जाऊ लागले आहे.
पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवाची सांगता उद्या होत आहे. आकर्षणाचे केंद्रबिंदू असणाऱ्या विसर्जन मिरवणुका यंदा दोन वर्षांच्या करोनामुक्तीमुळे धुमधडाक्यात होत आहेत. त्यामुळे गणेशभक्तांचा आनंद द्विगणीत असल्याचे पाहिला मिळत आहे. सरकारने देखील यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सांगितले. त्यानंतर पुणे पोलिसांनी देखील नियम शिथिल केले.
दरवर्षी प्रमुख मंडळांसमोर तीन ढोल-ताशा पथक लावण्याचा नियम यंदा पोलिसांनी न ठेवल्याने परिणामी मिरवणुका लांबणार असल्याचे दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये झालेली विसर्जन मिरवणूक अत्यंत कमी वेळात 24 तासांत पूर्ण झाली होती. त्याअधी 26 तास लागला. यावेळी ढोल-ताशा पथकावर मर्यादा आणि मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी मंडळांना पुढे नेत मिरवणूक कमी वेळेत संपविण्यासाठी पोलिसांचा खटाटोप चालत असे.
सहा वर्षांतील मिरवणूक वेळा
2014- 29 तास 12 मिनिटे
2015- 28 तास 38 मिनिटे
2016- 28 तास 30 मिनिटे
2017- 28 तास 05 मिनिटे
2018- 26 तास 36 मिनिटे
2019- 24 तास
दुप्पट गर्दी होण्याची शक्यता
विसर्जन मिरवणुकीत यंदा दुप्पट गर्दी होण्याची शक्यता पुणे पोलिसांनी वर्तवली आहे. दरवर्षी चार ते साडेचार लाख गणेशभक्त विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. यंदा मात्र, ही संख्या दुप्पट होईल. त्यानुसार, पोलिसांकडून नियोजन करण्यात आले आहे. गर्दीला नियत्रंण करण्यासोबतच छेडछाड तसेच चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांचा खडा पहारा असणार आहे.