कोथरूड – एनडीए चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन होऊन 15 दिवसही झाले नाही तोच चौक पुन्हा कोंडीत अडकला आहे. उद्घाटनाचा मुहूर्त साधून झाल्यानंतर आता उर्वरित कामे सुरू करण्यात आली आहेत. वेदभवन येथील नवीन पुलावरील (अंडरपास) गर्डर टाकण्याच्या कामाला सुरवात झाल्यामुळे महामार्गावरील दोन लेन बंद करण्यात आल्या आहेत, त्यामुळे एनडीए चौकात सकाळी आणि सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
वेदभवन येथील महामार्गावरील पुलाजवळ आणखी एक अंडरपास तयार करण्यात येत आहे. त्याचे पिलर एक महिन्यांपूर्वीच उभारण्यात आले असून आता या पिलरवर गर्डर टाकण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूला लेन टप्याटप्याने बंद करून काम करण्यात येत आहे. या कामाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकडून सातारच्या दिशेने जाणारी लेन बंद केल्यामुळे महामार्गासह सर्व्हिस रस्त्यावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली. यावेळी महामार्ग, मुळशी आणि बावधनकडून कोथरूड आणि सातारला जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबपर्यंत रांगा गेल्यामुळे रस्ते, पूल होऊनही कोंडी कशी? असा प्रश्न चालकांना पडत आहे.
काम अद्यापही सुरू…
उड्डाणपुलाचे उद्घाटन झाल्यानंतर पूल वाहतुकीसाठी खुलाही करण्यात आला आहे. परंतु, काही कामे अद्याप झालेली नाहीत. अंडपास सारख्या मोठ्या कामांची सुरूवात तर उद्घाटनानंतर करण्यात आली आहे. या कामासाठी लेन बंद ठेवण्यात येत असल्याने रात्रीच्या वेळी कोंडी होत आहे.
पुढील दोन महिने या अंडरपासचे काम चालणार आहे. टप्याटप्याने लेन बंद करून गर्डर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी लक्षात घेता, महामार्गासह सर्व्हिस रस्त्यावर वाहतूक पोलीस थांबून वाहतुकीचे नियोजन केले जात आहे.
– विशाल पवार, सहायक पोलीस निरीक्षक, वारजे वाहतूक विभाग
वेदभवन याठिकाणी नवीन अंडरपास करण्याचे काम सुरू आहे. पिलर अधीच उभारण्यात आले आहे. महामार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूची एक लेन बंद करून गर्डर टाकणे आणि त्यावर स्लॅप टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काही दिवस हे काम चालणार आहे. – भारत तोडकरी, अधिकारी एनएचएआय