पुणे – राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेकडून येत्या 31 मे रोजी निवडणूकांसाठी महिलांसाठीच्या राखीव जागांची आरक्षण सोडत प्रशासनाकडून गणेश कला क्रीडा मंचाच्या ठिकाणी काढली जाणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे,निवडणूक प्रमुख डॉ. यशवंत माने यांनी या सोडतीसाठी आज पाहणी केली. तसेच या सोडतीपूर्वी एक दिवस आधी रंगीत तालीमही प्रशासनाने आयोजित केली आहे.
महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणा शिवाय, महापालिकेच्या निवडणूका होणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आता केवळ महिलांसाठीचे प्रभाग तसेच एससी आणि एसटीसाठी आरक्षित ठरलेल्या प्रभागांमधील महिलांसाठीच्या राखीव जागांचे आरक्षण काढले जाणार आहे. दरम्यान, पालिकेच्या निवडणूकांसाठी 58 प्रभाग निश्चित असून 57 प्रभाग 3 सदस्यांचे तर एक प्रभाग 2 सदस्यांचा असणार आहे. एकूण सदस्य संख्या 173 असून महिलांसाठी 87 जागा राखीव असणार आहेत.
या जागांसाठी ही आरक्षणे काढली जाणार आहेत. या आरक्षण सोडतीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने महापालिकेकडून गणेश कला मंचाची निवड करण्यात आली आहे. या शिवाय, अनुसूचित जाती, जमाती व महिला आरक्षणासाठी चिठ्ठ्या तयार करणे, सोडतीचे व्हिडिओ चित्रीकरण करणे, सोडतीचे लाइव्ह प्रसारण करणे, स्टेजवर तसेच बाहेरील बाजूस एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत.