जिल्हाभरात खासगी टॅंकरची संख्या 110 वर
पुणे – जिल्ह्यात दुष्काळग्रस्त गावांमध्ये पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे 13 पैकी अकरा तालुक्यांमधील 70 गावे 759 वाड्या-वस्त्यावरील सव्वादोन लाख नागरिकांसाठी तब्बल 120 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, त्यामध्ये शासकीय टॅंकर केवळ 10 असून, खासगी टॅंकरची संख्या 110 इतकी आहे. त्यावरून यंदाच्या दुष्काळात खासगी टॅंकरदारांची “चांदी’ होत असल्याचे दिसून येते.
बारामती, भोर, आंबेगाव, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, वेल्हा, खेड, पुरंदर आणि शिरूर या अकरा तालुक्यांमध्ये पाण्याची भीषण परिस्थिती आहे. गतवर्षी जिल्ह्यात 84 टॅंकर सुरू होते. परंतू, यंदा 18 एप्रिल अखेपर्यंत टॅंकरचा आकडा 120 वर गेला असून, टॅंकरची संख्या आणखीन वाढण्याची भिती आहे. परंतू, या वाढत्या टॅंकरमध्ये शासकीय टॅंकरची संख्या अधिक असणे अपेक्षीत आहे. मात्र, तसे न होता शासकीय टॅंकर केवळ 10 आहे. त्यामध्ये बारामतीमध्ये एकूण 32 टॅंकर सुरू असून त्यामध्ये 4 टॅंकर शासकीय तर 28 टॅंकर खासगी आहेत. शिरूर तालुक्यात 21 टॅंकर सुरू असून त्यातील एकही टॅंकर शासकीय नाही.
दरम्यान, खासगी टॅंकरसाठी शासनाकडून निविदा प्रक्रिया राबविली जाते. त्यानुसार तब्बल 100 हून पेक्षा अधिक खासगी टॅंकर सुरू असल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची सुविधा योग्यच आहे. परंतू आवश्यक त्या ठिकाणी पाणीनुसार टॅंकर पुरविणे महत्वाचे आहेच. मात्र खासगी टॅंकर एवजी शासनाने प्रशासकीय व्यवस्था निर्माण करून त्यावर पर्याय काढणे महत्वाचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. मात्र, प्रशासनाकडून जाणीवपूर्वक खासगी टॅंकरदारांना जवळ केले जात असल्याचे स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे. तेराही तालुक्यांत 29 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यापैकी आंबेगांवमध्ये 10 तर पुरंदर, शिरूर, बारामतीसाठी प्रत्येकी 3 तर जुन्नर, खेड तालुक्यांसाठी प्रत्येकी 2 विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
शासकीय टॅंकर उपलब्ध नाहीत?
दुष्काळाची परिस्थिती माहिती असूनही शासकीय टॅंकर वाढविण्याबाबत कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाही. टंचाईग्रस्त क्षेत्रात पाणी मिळणे हे महत्वाचे आहे, मग त्याठिकाणी शासकीय टॅंकर असो की खासगी. मात्र, खासगी टॅंकरमुळे प्रशासनाचा काय फायदा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सद्यस्थितीत बारामती आणि खेड येथे प्रत्येकी 4 अणि पुरंदरमध्ये 2 असे शासकीय टॅंकर सुरू आहेत. तर आंबेगाव येथे 12, बारामती 28, भोर 1, दौंड 11, हवेली 3, इंदापूर 10, जुन्नर 9, खेड 1, पुरंदर 13, शिरूर 21 आणि वेल्हा येथे 1 खासगी टॅंकर सुरू आहेत.