हडपसर -सेलेना पार्क जवळील 25 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम झाल्यापासून. या टाकीमधून काळेपडळ परिसरातील व गृह रचना सोसायटींना मुबलक पाणी मिळत आहे. परंतु, हांडेवाडी रोड, बडदे मळा, भुजबळ स्कीम जवळील 35 लाख लिटर पाण्याच्या टाकीचे बांधकाम बंद आहे. या टाकीचे कामही लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी माजी नगरसेविका विजया वाडकर यांनी केली आहे.
सेलेना पार्क पाण्याची टाकी तसेच रामटेकडी ते पाण्याच्या टाकीपर्यंत पाण्याच्या लाइनला मंजुरी व निधी आपल्या कार्यकाळात उपलब्ध करून देण्यात आला होता. दरम्यानच्या काही काळात हा प्रकल्प रेंगाळला. मात्र, गेली सहा महिने या टाकीतून पाणी पुरवठा सुरू आहे परंतु, बडदे मळा येथील पाण्याची टाकीचे काम बंद असल्याने ते सुरू करण्याबाबत माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ घेऊन पालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे विजया वाडकर यांनी सांगितले.
सेलेना पार्क जवळील 25 लाख लिटर पाण्याच्या टाकीमुळे या परिसरातील गृहरचना सोसायटीत येणारे पाण्याचे टॅंकर बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहेत. यामुळे गृहरचना सोसायटीतील टॅंकरच्या पाण्याच्या पैशात जाणारा मेंटेन्स वाचत आहे. परिसरातील नागरिक व गृह सोसायटीतील नागरिक समाधान व्यक्त करत आहे.
– विजया पोपटराव वाडकर, माजी नगरसेविका
आमची या परिसरातील सर्वात मोठी गृह रचना सोसायटी असून सेलेना पार्क टाकीमुळे आमचे जवळजवळ 90 टक्के बाहेरील विकत घेण्याचे टॅंकर वाचत आहे, त्यामुळे मेंटेनन्सच्या पैशाचा पाण्याच्या टॅंकर मध्ये जाणारा पैसा वाचत आहे.
– प्रवीण लांडगे, चेअरमन, ड्रिम्स आकृती फेडरेशन
आता आमच्याकडे या टाकीतून जादा पाणी मिळत असल्याने 50 टक्के बाहेरील टॅंकरचे प्रमाण कमी झाली आहे. बडदे मळा जवळील दुसरी टाकी झाली, तर आमची सोसायटी टॅंकर मुक्त होईल. प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी या दुसऱ्या टाकीसाठी प्राधान्य देऊन प्रयत्न करावे.
– अतुल फड, राहुल दाते, कुमार पेबल पार्क सोसायटी
आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा सेलेना पार्क टाकी झाल्यामुळे महापालिकेचे पाणी पूर्वीपेक्षा जास्त येत आहे. त्यामुळे कधी-कधी बाहेरील टॅंकर विकत घेण्याची वेळ येत नाही.
– विकास भुजबळ, माजी चेअरमन, गंगा विलेज सोसायटी
टाकीमुळे आम्हाला आता बाहेरील फक्त 50 टक्के टॅंकर लागत आहेत. नियमानुसार आम्ही जादा कनेक्शनची मागणी करीत आहोत. हे कनेक्शन मिळाले तर बाहेरील टॅंकर विकत घेण्याची गरज भासणार नाही असे वाटते.
– अमर पाटील, चेअरमन सेलेना पार्क सोसायटी
सेलेना पार्क टाकीमुळे काळेपडळ परिसरात पाण्याचा दाब वाढला असून पाणीटंचाई काही प्रमाणात दूर झाली आहे. पाणी वाटप समप्रमाणात झाले पाहिजे.
– विलास मोरे, काळेपडळ