पुणे-पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना फुटली दोन आठवड्यांपूर्वी खरेच फुटली होती का? याबाबतचे सत्य येत्या दोनच दिवसांत उलगडणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्र.13 हा द्विसदस्यीय प्रभाग होणार आहे. सध्याचा प्रभाग क्र. 9 अर्थात बाणेर – बालेवाडी मधील बाणेर-बालेवाडीचा काही भाग आणि सूस-म्हाळुंगे ही नव्याने गावे एकत्रित द्विसदस्यीय प्रभाग रचना केल्याचे दोन आठवड्यांपूर्वी “व्हायरल’झाले होते. त्यावरून बरीच खळबळ उडाली होती आणि एका स्थानिक नेत्याने तर थेट न्यायालयात धाव घेत याचिकाही दाखल केली होती.
महापालिकेने प्रभाग रचना करताना दरवेळप्रमाणे यावेळीही मोठ्याप्रमाणावर हस्तक्षेप झाल्याचे आरोप प्रत्यारोप झाले आहेत. एवढेच नाहीतर सध्याचा बाणेर-बालेवाडी प्रभाग क्र.9चे विभाजन करून बाणेर, बालेवाडीचा काही भाग आणि सूस या नव्याने समाविष्ट गावांचा सहभाग करून द्विसदस्यीय प्रभाग रचना केल्याचे अगदी नाकाशासह व्हायरल झाल्याची जोरदार चर्चा झाली. काही जणांना हीच प्रभाग रचना आहे असे वाटून त्यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र, नंतर ती अधिकृत प्रभाग रचना नाही, कोणीतरी खोडसाळपणे ती “व्हायरल’ केल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
या प्रकारानंतर सावध भूमिका घेत राज्य निवडणूक आयोगाने पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेत जाणीवपूर्वक लक्ष घातले. संपूर्ण शहरातील प्रारूप प्रभाग रचनेतील नैसर्गिक सीमारेषेच्या 24 पेक्षा अधिक त्रुटी काढून स्वत:च्या अखत्यारीत त्या दुरुस्तही करून घेतल्याची चर्चा मात्र सध्या “व्हायरल’ होत आहे. आता दोनच दिवसांत प्रभाग रचना जाहीर होत आहे. त्यामुळे दोन आठवड्यांपूर्वी “फुटलेली’ प्रभाग रचना आणि दोन दिवसांनी अधिकृतपणे जाहीर होणारी प्रभागरचना यातील सत्य-असत्य हे समजणार आहे.