प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 -महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तीन सदस्यांची प्रभाग रचना रद्द केली जाणार आहे. याबाबतचा सुधारित प्रस्ताव बुधवारी विधीमंडळात दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावावर चर्चा होऊन तो मान्य झाल्यानंतर राज्यातील मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुकीच्या नवीन प्रभाग रचनेला पुन्हा नव्याने सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने 2021 ची जनगणना जाहीर झालेली नसल्याने तसेच महापालिकांची हद्द वाढल्याने पालिका सदस्यांची संख्या वाढविली होती. तसेच सप्टेंबर 2021 मध्ये तीन सदस्यांनुसार प्रभाग रचना करण्यास मान्यता दिली होती. मात्र, महिन्याभरापूर्वी राज्यात सत्तेत आलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप सरकारने पालिका सदस्यांची वाढविलेली संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, कायद्यात सुधारणा करावी लागणार असल्याने प्रभाग रचना किती सदस्यांची असावी, याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नव्हता. त्यातच आता राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्याने या अधिवेशनात प्रभाग रचनेच्या कायद्यात महाविकास आघाडीने केलेल्या सुधारणांचा आदेश रद्द करून पूर्वीप्रमाणेच चार सदस्यांच्या प्रभाग रचनेनुसार, नव्याने प्रभाग रचना केली जाईल, यावर या अधिवेशनात पुढील काही दिवसांत निर्णय घेतला जाईल
प्रभाग रचनेचा मार्ग मोकळा होणार
महापालिका आघाडी सरकारच्या तीन सदस्यांच्या प्रभागानुसार, महापालिकेने मार्च 2022 मध्ये प्रभाग रचना पूर्ण केली होती. त्यानंतर, आता पुन्हा शासनाने सदस्य कमी केल्याने राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेस पत्र पाठवित निवडणुका आणि प्रभाग रचनेच्या आरक्षणाचा कार्यक्रम स्थगित करण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच पुढील आदेशापर्यंत निवडणुकांचे कामकाज थांबविण्यास सांगण्यात होते. मात्र, हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर चारच्या रचनेनुसार, नव्याने प्रभाग रचना केली जाईल. या शिवाय, नव्याने आरक्षण सोडतही काढावी लागणार असून, मतदार याद्याही नव्याने अंतिम कराव्या लागणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया आणखी तीन महिने पुढे जाऊन डिसेंबर-जानेवारीमध्ये निवडणुका होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.