प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 -आरोग्याच्या प्रश्नांवर अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांची दीर्घकालीन सार्वजनिक-खासगी भागीदारी महत्वपूर्ण ठरली आहे. या भागीदारीचा जागतिक पातळीवर प्रभाव पडला असून, सध्याच्या काळात आरोग्याच्या आव्हानांना हाताळण्यासाठी ही भागीदारी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने करोना प्रादुर्भावाच्या काळात जगभरातील लोकांचे जीव वाचवण्यासाठी मदत केली आहे. येथे भेट दिल्याचा मला आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या परराष्ट्र सेवा सदस्य (यूएस चार्ज डी अफेअर्स) पॅट्रिशिया लॅसिना यांनी बुधवारी दिली.
अमेरिका-भारत यांचा द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसेच आरोग्यासंदर्भात सहयोग राहावा म्हणून या शिष्टमंडळाने “सिरम’ला बुधवारी भेट दिली. यामध्ये अमेरिकेचे मुंबईतील महावाणिज्य दूत माइक हॅन्की, एचएचएस हेल्थच्या डॉ. प्रीथा राजारामन आणि “यूएस एफडीए’चे संचालक डॉ. सारा मॅकलुहान यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने सिरमचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला आणि “नोव्हावॅक्स इन्क’चे स्टॅनली सी. अर्क यांची भेट घेतली.
नोव्हाव्हॅक्स ही अमेरिका स्थित कंपनी असून, भारताच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या लसविकास आणि निर्मितीसाठी त्यांनी भागीदारी केली आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने “नोव्हावॅक्सच्या नोव्हॅक्सोव्हिड’ या लसीला मान्यता दिल्याने सिरम हे अमेरिकेतील बाजारपेठेत प्रवेश मिळवणारी पहिली भारतीय लस ठरली आहे. या लशीचे सुमारे 35 लाख डोस अमेरिकेत पाठवण्यात आले आहेत.
अमेरिका आणि भारत हे दीर्घ काळापासून परस्परांसोबत आहेत. या भागीदारीतून नागरिकांचा आणि जगाचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. जागतिक लसीकरण आणि महासाथीपासून दिलासा देण्यासाठी या दोन्ही देशांमधील सहकार्य प्रेरणादायी आहे, असे मत अदर पूनावाला यांनी व्यक्त केले.
भारताची भूमिका महत्त्वाची
अमेरिकेतील “नोव्हावॅक्स इन्क’चे सीईओ स्टॅनली सी. अर्क यांनी विनाशकारी महासाथीत भारताने महत्त्वाची भूमिका निभावल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच जागतिक पातळीवर वेगाने प्रगती करणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास येत असताना सर्व आघाड्यांवर या देशाचा सखोल प्रभाव पडणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.