रसिकांच्या आठवणी ताज्या; नव्या स्वरुपात येण्याची शक्यता
पुणे – गाजलेल्या “हाऊसफुल्ल’ चित्रपटांची साक्षीदार असणारी विजय टॉकीज पुनर्विकासासाठी पाडण्यात येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या पिढ्यान् पिढ्यांचे मनोरंजन करणारे हे चित्रपटगृह काळाच्या पडद्याआड जात आहे.
कमी तिकीटदर असल्याने चित्रपटप्रेमींसाठी हक्काचे स्थान, अशी विजय चित्र मंदिर अर्थात विजय टॉकीजची ओळख आहे. पूर्वी लिमये नाट्य चित्र मंदिर असेही म्हटले जात होते. याशिवाय मध्यवर्ती भागात राहणारे नागरिक, आसपासचे व्यापारी यासाठी विजय टॉकीज ही लक्ष्मी रस्त्याची महत्त्वाची खूण आहे.
मल्टीप्लेक्सच्या जगातही प्रेक्षकांची पसंती असणारे हे चित्रपटगृह होते. मात्र, हे चित्रपटगृह आता पडद्याआड जात आहे. मागील दोन दिवसांपूर्वी विजय टॉकीज पाडण्याचे काम सुरू झाले आहे. याचे फोटो सोशल मीडियावर शेअर होत असून विजय टॉकीजच्या अनेक आठवणींना रसिक प्रेक्षक उजाळा देखील देत आहेत.
विजय टॉकीजमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अधिक गर्दी असायची. विशेषत: इंग्रजी चित्रपट पाहण्यासाठी लेक्चरला दांडी मारून अनेक जण येथे यायचे. या टॉकीजचे दर कमी असल्याने चित्रपट पाहणे परवडायचे, अशा आठवणी प्रेक्षकांनी सांगितल्या. विजय टॉकीज हे शहरातील जुन्या चित्रपटगृहांपैकी एक आहे.
याठिकाणी नव्याने काही वास्तू उभी राहिल्यास “विजय टॉकीज’च्या आठवणी मात्र कायम ठेवाव्यात, जेणेकरुन पुढील पिढीला हा वारसा दाखवता येतील, असे मत सुनील महाजन यांनी व्यक्त केले. याबाबत विजय टॉकीजचे बाळासाहेब निकम यांच्याशी संपर्क केला असता, संबंधित जागेचा पुनर्विकास करण्यात येत असून, याची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले.