9 लाख जणांना पहिला, तर 2 लाख जणांना दुसरा डोस
पुणे – ग्रामीणमध्ये मागील एक महिन्यांपासून करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे 13 तालुक्यांत एकूण 11 लाख 29 हजार 866 लाभार्थ्यांना आतापर्यंत लस देण्यात आली. त्यामध्ये 9 लाख 19 हजार 451 जणांनी पहिला, तर 2 लाख 10 हजार 415 जणांनी दुसरा डोस देण्यात आला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने कमी असून, आता कोव्हिशील्ड लसीचा दुसरा डोस 84 दिवसांनंतर द्यायचा असल्यामुळे लसीकरणाचा वेग आणखीन मंदावला आहे.
ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालय, कोविड सेंटर येथील लसीकरणाचा वेग मंदावला असला तरी, आता खासगी रुग्णांलयांकडूनही लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे वयवर्षे 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींची लसीकरणासाठी गर्दी होवू लागली आहे. केंद्राकडून राज्याला येणाऱ्या लसीच्या साठ्यातून प्रत्येक जिल्ह्याला लस पुरवठा केला जात आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी मोजक्याच लसीचा साठा वाट्याला येत आहे. त्यामुळे येणारी लस एक ते दोन दिवसांत संपते आणि पुन्हा दोन ते तीन दिवस लसीकरण केंद्र लसीअभावी बंद ठेवावे लागत आहे.
तर, खासगी रुग्णालयात नोंदणी करताच लस उपलब्ध होत असल्यामुळे आता खासगी रुग्णालयामध्ये लसीकरणाचा वेग वाढलेला दिसून येतो. दरम्यान, ग्रामीण भागात आतापर्यंत 11 लाख 29 हजार 866 लाभार्थ्यांना लस देण्यात आली असून, त्यामध्ये हवेली, खेड, जुन्नर, बारामती आणि इंदापूर तालुक्यांत लस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तर, दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये सर्वच तालुक्यांत संख्या कमी असल्याचे दिसून येते.