पुणे – 7 जिल्ह्यांमध्ये भूजल व्यवस्थापनाचा प्रयोग

कृषी व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाचा उपक्रम

पुणे – लोकसहभागावर आधारित भूजल व्यवस्थापन ही संकल्पना पुढे येत आहे. त्यादृष्टीने भूजलाचे व्यवस्थापन झाले पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पाणी मागणी आधारित भूजल व्यवस्थापनाचे नियोजन केले जात आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या दोन विभागाच्यावतीने हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात कृषी आयुक्त सुहास दिवसे व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी दोन्ही खात्यांची बैठक घेऊन या प्रयोगाबाबत चर्चा करून त्यांचे नियोजन केले यास कृषी खात्यामर्फत अनिल बनसोडे, संचालक (आत्मा), श्री विजय घावटे, संचालक (विस्तार व प्रशिक्षण), दोन्ही खात्याचे इतर वरिष्ठ अधिकारी व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार प्रायमुव्ह हे उपस्थित होते.

दिवसेंदिवस वाढत जाणारा भूजलाचा उपसा, नगदी पिके घेण्याचा कल आणि पाणीटंचाईचे संकट या चक्रातून बाहेर पडण्याचे आव्हान शासन तसेच जनमानसांवर आहे. जल व मृदसंधारणाची राज्यात विविध कामे केली जातात. याचा उपयोग मुख्यत्वे पाणी अडविणे व भूगर्भात मुरविण्याकरिता होतो.

मात्र भूजलाच्या शाश्‍वत व्यवस्थापनासाठी हे पुरेसे नाही हे आता विविध ठिकाणच्या अनुभवाअंती सिद्ध झाले आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठीच हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. जागतिक बॅंक अर्थसहाय्यित जलस्वराज-दोन प्रकल्पांतर्गत पुणे, सातारा, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा व अमरावती या सात जिल्ह्यांतील अतिशोषित व शोषित पाणलोटातील 102 गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

पाणी व्यवस्थापनाकरिता करण्यात आलेला हा स्तुत्य उपक्रम असून कृषी खात्यामार्फत अधिकधिक प्रभावीपणे याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आयुक्त दिवसे यांनी यावेळी सांगितले. तसेच लोकांना पाणी उपलब्धतेनुसार पिक पेरणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मॉडेल लक्षणीय ठरणार
शेती व भूजल या दोन्ही विषयांचा परस्पर संबंध लक्षात घेता पुढील नियोजन सुकर होण्याच्या दृष्टिकोनातून भूजल व्यवस्थापनाचे हे एक लक्षणीय मॉडेल ठरणार असून भविष्यात हा अनेक उपक्रमांना पथदर्शी ठरणार असल्याचे संचालक दिवेगावकर म्हणाले. दोनही खात्यामंध्ये सामंजस्य कराराद्वारे येत्या खरीप हंगामापासूनच या आराखड्याची सुरुवात होणार असून साधारणपणे पुढील 7 ते 8 महिन्यांत याचे दृश्‍य परिणाम दिसून येतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.