पुणे – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा कामाचा धडाका सुरू केला आहे. ज्या खडकवासला मतदारसंघातून विरोधी उमेदवार कांचन कुल यांना 65 हजारांचे मताधिक्क्य मिळाले, त्याच खडकवासला मतदारसंघातील समस्या सोडविण्यासाठी आणि प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी सोमवारी त्यांनी महापालिका गाठली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे आदी उपस्थित होते. धायरीतील पाण्याचा प्रश्न, सिंहगड रस्त्याला पर्यायी कालव्यालगतचा रस्ता, कचऱ्याची समस्या, नादुरूस्त पथदिवे, बाह्यवळण मार्गावर आंबेगाव येथे रस्त्याच्याकडेला झालेली अतिक्रमणे आदी समस्यांकडे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासह सर्व विभागाचे विभागप्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सर्व समस्या जाणून घेतल्या असून तूर्तास ज्या प्रभागात पोटनिवडणूक आहे, तो भाग वगळून उर्वरित भागातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन निंबाळकर यांनी दिले.