पुणे –एक लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांनी नागरिकांसाठी वरदान ठरलेली महापालिकेची शहरी गरीब योजना शहरातील सर्व खासगी रुग्णालयात सुरू ठेवण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. याबाबत माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सध्या ही योजना शहरातील सुमारे 70 रुग्णालयात सुरू आहे. तर प्रशासनाने या योजनेतून 11 रुग्णालये वगळली होती.
रासने म्हणाले, ‘महापालिका प्रशासनाने काही खासगी रुग्णालये शहरी गरीब योजनेतून वगळली होती. त्यामुळे योजनेत सहभागी झालेल्या रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. खासगी रुग्णालयात छोट्या-मोठ्या आजारांसाठी, शस्त्रक्रियेसाठी दाखल होणाऱ्यांना या योजनेमुळे आर्थिक सवलत मिळते. हृदय, किडनी, कॅन्सर अशा खर्चिक आजारातील रुग्णांसाठी ही योजना फायद्याची आहे. करोना काळात आर्थिक परिस्थिती खालावलेल्या कुटुंबांसाठी या योजनेत उपचार घेणे दिलासाकारक ठरणार आहे.’
योजनेतून कोणालाही वगळणार नाही
2009 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. गेल्या वर्षी या योजनेचा लाभ घेतलेल्या मिळकतकरधारक किंवा सदनिकाधारक लाभार्थींच्या चौकशी करणाऱ्या नोटीस प्रशासनाने पाठवल्या होत्या. परंतु लाभार्थी मिळकतकरधारक किंवा सदनिकाधारक नसावा, अशी कुठलीच अट या योजनेच्या नियमावलीत नव्हती. तसेच या लाभार्थीचे उत्पन्न एक लाखांपेक्षा अधिक असेलच असे ही नाही. ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त, विधवा महिला, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचा लाभाथर्भंमध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे मिळकतकरधारक आहे, म्हणून या लाभार्थींना योजनेतून वगळता येणार नाही, अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत.’