पुणे – उच्च शिक्षण घेत असलेल्या दोन तरुणांनी उधारी फेडण्यासाठी चक्क सोन साखळी चोरण्याचा मार्ग अवलंबला. मात्र पहिल्याच प्रयत्नात केलेली त्यांची चोरी पकडली गेली. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोघांनाही अटक केली.
कार्तिक अनिल देशमुख (22), आशुतोष चंद्रेश पांडे ( 20, दोघेही रा. वडगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणांचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी हे मराठवाडा कॉलेज समोरून पायी जात होते, यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी 89 हजार किमतीची सोन्याची चैन हिसका मारून चोरून नेली होती. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट एकचे पथक करत होते.
तपासात त्यांनी कार्तिक देशमुख आणि आशुतोष पांडे यांना अटक केली. दोन्ही आरोपींकडून गुन्हयात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. कार्तिकचे नुकतेच शिक्षण झाले असून तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. तर आशुतोष अकोला येथे बीबीएचे शिक्षण घेतो. कार्तिकचा भाऊ आणि आशुतोष एकाच वर्गात शिक्षण घेतात.
अकोला येथील काही मुले शिक्षण आणि नोकरीनिमीत्त सिंहगड परिसरात खोली घेऊन रहातात. आशुतोष क्लास लावण्यासाठी पुण्यात आला होता. तेव्हा कार्तिकने आपली खुप उधारी झाली असून ती फेडण्यासाठी सोन साखळी चोरु असा कट रचला. यानंतर दोघांनीही दुचाकीवरुन शहरभर फेरफटका मारण्यास सुरवात केली. तेव्हा त्यांना डेक्कन येथे सोनसाखळी चोरायची संधी मिळाली.
ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे याच्या मार्गदर्शनाखाली युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक रमेश तापकीर, पोलीस अंमलदार राहुल मखरे, अजय थोरात, शंकर कुंभार, शशिकांत नरुटे, दत्ता सोनवणे शशीकांत दरेकर , निलेश साबळे, अण्णा माने, इक्रान शेख, महेश बामगुडे, शुभम देसाई, विनोद कोंढाळकर, रुक्साना नदाफ यांच्या पथकाने केली.