पुणे – अवजड वाहनावर (ट्रेलर) ट्रक आदळून झालेल्या अपघातात ट्रकचालकासह दोघांचा मृत्यू झाल्याची पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. ट्रकचालक शकील इस्माइल शेख (वय ४५, रा. बसवकल्याण, बिदर, कर्नाटक), मदतनीस अनिल अंकुश सूर्यवंशी (वय ३५, रा. केळगाव, जि. लातूर) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
अवजड वाहनचालक अण्णासाहेब गायकवाड (वय ४५, रा. मुंढवा) यांनी यासंदर्भात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावर पहाटे चारच्या सुमारास ट्रेलरचालक गायकवाड वळत होते. त्यांनी पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांना सिग्नल दिला होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणारा ट्रक ट्रेलरवर आदळला.
अपघातात ट्रकचालक शकील शेख आणि मदतनीस सूर्यवंशी गंभीर जखमी झाले. अपघातात ट्रेलर चालक गायकवाड जखमी झाले. गंभीर जखमी झालेले ट्रकचालक शेख आणि सूर्यवंशी यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी तपास करत आहेत.