वॉशिंग्टन – जगभरात करोना संसर्गामुळे शाळा बंद आहेत. आता कुठं शाळा सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वत्र शाळा कधी सुरू होणार अशी चर्चा आहे. मात्र अमेरिकेतील शिकागो येथील शाळा तेथील अजब पॉलिसीमुळे जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत.
नव्या पॉलिसीनुसार पाचवीच्या वरील विद्यार्थ्यांना शाळेकडूनच कंडोमची व्यवस्था करून द्यावी लागेल. म्हणजे 10 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कंडोमची व्यवस्था करून देण्याची जबाबदारी शाळेची असेल.
या आदेशानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अमेरिकेतील शिकागो शहरातील शाळांमध्ये जारी केलेल्या या संदर्भातील आदेशानंतर आता सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. लोक या आदेशाला लज्जास्पद आणि विकृत मानसिकता असल्याचं मानत आहेत.
कंडोमच्या वापरामुळे मुलांमध्ये लैंगिक संक्रमणामुळे होणारे आजार, एचआयव्ही इन्फेक्शन आणि अनपेक्षित प्रेग्नेन्सी रोखण्यात मदत मिळेल, असं शिकागो पब्लिक स्कूल बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
पाचवीपासूनच्या विद्यार्थ्यांना कंडोम देण्याची पॉलिसी डिसेंबर 2020 मध्ये तयार करण्यात आली होती. मात्र करोना साथीमुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे याची अंमलबजावणी करण्यात आली नाही.
शिकागोमध्ये पुढील महिन्यापासून शाळा सुरू होणार आहेत.