मालगाडीचे इंजिन बंद; काही काळ वाहतूक ठप्प
पुणे – पुणे-लोणावळा लोहमार्गावरील शेलारवाडीजवळ एका मालगाडीचे इंजिन बंद पडल्यामुळे बुधवारी सकाळी पुणे-मुंबईदरम्यान होणारी रेल्वेची प्रवासी वाहतूक काही काळ ठप्प होती. अनेक गाड्यांना मुंबईला पोहोचायला उशीर झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
सकाळी 9.18 मिनिटांनी शेलारवाडी येथे एका मालगाडीचे इंजिन (लोको) अचानक बंद पडले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला पुणे-मुंबई दरम्यान होणारी प्रवासी वाहतूक काही वेळ थांबवावी लागली. मात्र, रेल्वेने सकाळी 9.35 वाजता घोरपुरी येथून दुसरे इंजिन आणून बसवले. तोपर्यंत 10 वाजून 53 मिनिटे झाली होती .मालगाडी मार्गस्थ केल्यानंतर थांबलेली प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
दरम्यान, या प्रकारामुळे मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस (12127) 88 मिनिटे, तळेगाव-पुणे लोकल (01587) 69 मिनिटे, लोकमान्य टिळक टर्मिनल- विशाखापट्टणम (18520) 53 मिनिटे आणि मुंबई-पुणे (डेक्कन एक्सप्रेस-11007) या गाडीला 17 मिनिटे उशीर झाला.
लोणावळा-पुणे (01559) ही लोकल 21 मिनिटे उशिराने धावली. त्यामुळे कामानिमित्त, बाहेरगावी किंवा पर्यटनासाठी निघालेल्या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. तसेच मुंबईवरून पुढे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली.