नियमबाह्य संस्थांची संख्या वाढण्याची शक्यता
पुणे – जिल्ह्यात आणखी अनधिकृत शाळा आहेत की नाही, याची शोधमोहीम घेण्याचे आदेश जिल्हा परिषदेकडून अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यातून जिल्ह्यातील अजूनही काही अनधिकृत शाळांची संख्या समोर येण्याची शक्यता आहे.
राज्यात अनधिकृत शाळेवर कारवाईचे सत्र सुरू आहे. अनधिकृत शाळेचा विषय विधिमंडळात चर्चिला गेला आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांना विरोधकांनी जाब विचारला आहे. त्यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अनधिकृत शाळांवर कारवाई केली जात असली तरी प्रत्यक्षात त्या शाळेतील मुलांचे नुकसान होऊ देणार नाही. तसेच त्या मुलांचे नजिकच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. एवढेच नव्हे, तर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस काढत त्यांना त्यांच्या जिल्ह्याच्या अखत्यारीत असलेल्या अनधिकृत शाळांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी पुणे जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना अनधिकृत शाळांचा शोध का घेतला जात नाही? त्यांच्यावर का कारवाई केली जात नाही, अशा आशयाचे पत्र पाठवून विचारणा केली आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये अनधिकृत शाळा आहे का, त्याचा शोध घेण्याची सूचना केली. शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळा बंद करणे, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे, त्या मुलांचे समायोजन करणे तसेच शाळा दंडात्मक कारवाई करूनही शाळा सुधारत नसेल तर त्यांच्यावर फौजदारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 16 अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, आणखी अनधिकृत शाळा सुरू आहेत काय, याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांना शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचा अहवाल लवकरच प्राप्त होईल.
-संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी, पुणे जिल्हा परिषद