पुणे – सततची होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नळ स्टॉप चौकात नव्याने उड्डाणपूल तयार करण्यात आला. त्याचे उद्घाटन होऊन तो वापरासाठी खुलाही करण्यात आला. मात्र, पुलाखालील रस्ते अरुंद असल्याने तसेच तेथे बेकायदा वाहने पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली आहे.
वाहतूक कोंडीतून सुटका नाहीच…
मागील आठवडाभर संध्याकाळी लॉ कॉलेज रोड, नळ स्टॉप आणि नव्याने बांधलेल्या उड्डाणपुलाच्या “एसएनडीटी’ येथील शेवटच्या भागाला प्रत्यक्षात भेट देण्यात आली. तेव्हा तेथे प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा म्हात्रे पुलावरून कोथरूड किंवा पौड रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. विधी महाविद्यालय रस्त्यावरून कोथरूड, वारजे, पौड रस्ता आणि कर्वेनगरकडे जाणाऱ्या वाहनधारकांना दररोज विशेषत: संध्याकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे “एफटीआयआय’ ते नळ स्टॉप चौकदरम्यान विधी महाविद्यालय रस्त्यावरही वाहनांचा खोळंबा होतो.
अरूंद रस्त्यामुळे वाहतुकीची गती कमी
वरिष्ठ निरीक्षक (वाहतूक) जयराम पायगुडे म्हणाले, विधी महाविद्यालय रस्ता, नळ स्टॉप आणि कर्वे रस्त्यावर दररोज संध्याकाळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचे अधिक मनुष्यबळ तैनात करत आहेत. तथापि, उड्डाणपुलाच्या उतारामुळे कर्वे रस्त्याची रुंदी एसएनडीटी चौकाच्या टोकाला बरीच कमी झाली आहे.जडवाहने किंवा पीएमपीएमएल बसेस या रस्त्यावर अतिशय संथ वेगाने जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. तसेच, दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून वाहने चालवणे कठीण जाते. पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजना राबविण्याची गरज आहे. सध्या एसएनडीटी चौकात पादचाऱ्यांच्या ये-जा करण्यासाठी अगदी लहान पदपथ उपलब्ध आहे.
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची गरज
या रस्त्यावरील वाहनचालकांशी संवाद साधला असता, लॉ कॉलेज रोड आणि कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सुमारे एक तास घालवावा लागत असल्याचे सांगण्यात आले. तसेच, रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.