पुणे – जगभरात दि. 14 फेब्रुवारी हा दिवस “व्हॅलेंटाइन डे’ म्हणून साजरा केला जातो. एखाद्या व्यक्तीसाठी आपल्या मनात असलेले प्रेम, मनातील भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून हा दिवस महत्त्वाचा ठरतो. केवळ तरुणच नव्हे, तर ज्येष्ठांमध्येही हा दिवस साजरा करण्याबाबत उत्सुकता असते. गेली दोन वर्षे करोनाच्या सावटामध्ये अडकल्यानंतर यंदा हा दिवस उत्साहात साजरा करता येणार असल्याने, त्याबाबत तरुणाईंमध्ये असलेला उत्साह रविवारी शहरात पाहायला मिळाला.
व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठादेखील फुलल्या होत्या. तर मॉल्स, दुकाने, हॉटेल्स विशेष सजावटीने लक्षवेधी ठरत होती. प्रेमी तरुणाई, पती-पत्नी एकमेकांना गिफ्ट देत हा दिवस साजरा करतात. तर खास गिफ्ट देण्यासाठी बाजारपेठा आठवडाभर आधीच सज्ज असतात. दरवर्षी “व्हॅलेंटाइन डे’ला वेगवेगळा ट्रेन्ड पाहायला मिळतो.
अनेकांनी रविवारच्या निमित्ताने खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे एफ.सी रोड, कॅम्प परिसरात बाजारपेठांमधील गिफ्ट शॉप्स, मॉल्स, दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होती. यंदा नेहमीच्या गिफ्ट पर्यायांशिवाय संदेश असणाऱ्या बॉटल्स, सॉफ्ट टॉइज, ड्रीम कॅचर आदींचा ट्रेन्ड आहे. ग्रिटिंग, फुले, दागिने, की-चेन्स, चॉकलेट, पुष्पगुच्छ आदीने बाजारपेठा सजल्या आहेत. दुकाने, मॉल्स, हॉटेल्समध्ये देखील खास फुगे, फुलांची सजावट केली आहे.
खास टॅटूचा ट्रेन्ड
आपल्या जोडीदाराचे नाव किंवा एखाद्या प्रसंग आठवणीत राहावा यासाठी “टॅटू’ काढण्याला प्राधान्य देतात. अगदी हटके हर्टपासून, जोडीदाराचे नाव, तारखा ते जोडीदारांच्या फोटोपर्यंत विविध खास टॅटू सध्या ट्रेन्डिंग आहेत.