पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत मंगळवारी फक्त कोविशिल्डचेच डोस दिले जाणार आहेत. 187 केंद्रांवर त्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रांवर 200 डोसचे नियोजन करण्यात आले आहे.
18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविशिल्डचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्याच्या ऑनलाइन बुकिंगची टक्केवारी 10 टक्के असून, ऑन दी स्पॉट बुकिंगही 10 टक्के आहे. तसेच दि.5 जुलैपूर्वी पहिला डोस घेतलेल्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना जी लस मिळणार आहे, त्याचे ऑनलाइन बुकिंग 40, तर 40 टक्के ऑन दी स्पॉट बुकिंग होणार आहे. दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दी स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने लस दिली जाणार आहे. याशिवाय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही प्राधान्याने लस देण्यात येणार आहे.