पुणे – नैऋत्य मोसमी पावसाचा (मान्सून) परतीचा प्रवास सुरू झाला असून, शुक्रवारी (दि. 6) मान्सून पुण्यासह नागपूर आणि मुंबई शहरातून माघारी फिरला. त्यामुळे पुढील दोन दिवसांत पुणे शहरासह राज्यातील कमाल तापमानात वाढ, तर रात्रीच्या किमान तापमानात घट होईल. दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री थंडी अशी परिस्थिती राहील, असा पुणे वेधशाळेकडून अंदाज वर्तविण्यात आला.
राज्यात हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे आणि मागील तीन ते चार दिवसांपासून उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. तर काही जिल्ह्यांत पावसाने विश्रांती घेतली आणि मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला. आज मान्सून नागपूर, परभणी, पुणे आणि अलिबागकडून जात असल्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र, गोवा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात पुढील तीन ते चार दिवस हलका पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
दरम्यान, पुणे शहरात मागील चार दिवसांपासून कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका जाणवत असून, उकाडाही वाढलेला आहे. येत्या काळात रात्री किमान तापमानात घट झाल्याने थंडी सुरू होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.