पुणे –राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयात सहायक प्राध्यापकांची 100 टक्के पद भरती करावी व तासिका तत्वावरील धोरण बंद करावे या मागणीसाठी नेट-सेट पीएच.डी. धारक संघर्ष समितीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पुणे ते बारामती पायी वारी सुरू केली आहे.
वित्तीय अडचणी, आरक्षणाचे प्रश्न, प्रशासकीय हलगर्जीपणा या कारणांमुळे गेली बारा वर्षांपासून सहायक प्राध्यापकांची भरती रखडलेली आहे. यामुळे उच्च शिक्षितांमधील बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. उच्च शिक्षणावरील शासनाकडून केलेल्या खर्चाबाबत कॅगने ताशेरे ओढले आहेत. विद्यार्थ्यांची विना प्राध्यापक ज्ञानदानात होत असलेली फसवणूक व उच्च शिक्षण व्यवस्थेचा वाजलेला बोजवारा अशा सर्व प्रश्नांवर वित्त विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांची एकत्रित बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करून मार्ग काढावा. यासाठी “उच्च शिक्षितांची वारी, बारामतीच्या दारी’ या उपक्रमांअतर्गत पात्रताधारक सर्व पदव्या गोविंदबाग येथे पायी वारी करुन अर्पण करणार आहे. 15 एप्रिल रोजी ही वारी बारामतीला पोहचणार आहे.
यावारीबाबत नेट-सेट पीएच.डी. धारक संघर्ष समितीचे प्रा. सुरेश देवढे पाटील, प्रमोद तांबे, डॉ. परमेश्वर पोळ, विश्वास देशमुख, कांचन जोशी यांनी माहिती दिली.