राष्ट्रवादी-शिवसेनेची प्राथमिक चर्चा : कॉंग्रेससोबतही होणार बैठक
पुणे – राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना चांगले यश मिळाले. त्यामुळे पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढण्यासाठी चर्चेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच प्राथमिक बैठक झाली असून, पुढील दोन ते तीन दिवसांत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांची बैठक होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुण्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येण्यावर हे तीनही पक्ष सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे.
महापालिका निवडणुकांसाठी दोनचा प्रभाग असावा, यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आग्रही होते. मात्र, शिवसेनेची भूमिका मुख्यमंत्री ठरवणार असल्याने शिवसेनेने याबाबत ठोस भूमिका घेतली नव्हती. मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांनी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा अंतिम निर्णयही घेतला. त्यावर दोन्ही कॉंग्रेसने आक्षेप घेला. तर कॉंग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत या निर्णयाविरोधात ठराव घेत दोनचा प्रभाग करण्याची मागणी करण्यात आली.
मात्र, शिवसेना तयार नसल्याने तीनच्या प्रभागाचा निर्णय कायम ठेवण्यात आला. त्यामुळे आता या तिन्ही पक्षांनी एकत्र लढण्याची वक्तव्ये केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी एकत्र निवडणुकांना सामोरे जाण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
जागावाटपावरही चर्चा
पुण्यात झालेल्या बैठकीत जागावाटपाचीही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. यात विद्यमान जागांसह मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जागा त्या-त्या पक्षाला देण्याबाबत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक एकमत झाल्याचे सांगण्यात आले. काही जागांबाबत सामंजस्याने निर्णय घेतला जाणार आहे. तसेच दोन्ही कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमधे पुढील काही दिवसांत चर्चा होणार असून, त्याबाबत एकमेकांना “मेसेज’ गेले आहेत.
राजकीय आकडेमोड सुरू
राष्ट्रवादी आणि शिवसेनेत झालेल्या जागावाटपाच्या चर्चेत महाविकास आघाडी झाल्यास राष्ट्रवादी आणि शिवसेना कॉंग्रेसचे मोठे भाऊ ठरणार आहेत. 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 41 नगरसेवक निवडून आले असून, 59 ठिकाणी राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला 110 ते 100 जागा मिळू शकतात.
तर शिवसेनेचे 2017 मध्ये 10 नगरसेवक निवडून आले असून 28 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे शिवसेनेला 40 ते 45 जागा मिळू शकतात, तर कॉंग्रेसचे 2017 मध्ये 9 नगरसेवक निवडून आले असून 16 ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर उमेदवार होते. त्यामुळे, कॉंग्रेसला 25 ते 30 जागा मिळू शकतात असे प्राथमिक गणित असू शकते अशी राजकीय चर्चा आहे.