कोथरूड – उन्हाचा चटका वाढत असताना, सावलीतून प्रवास करण्याचा अनुभव नक्कीच आनंददायी आहे. पूर्वी महामार्ग, राज्यमार्ग तसेच शहर, उपनगरांतील रस्त्याकडेने लावलेली चिंच, पिंपळ, वड अशी “शासकीय’ झाडे सावली देण्याचे काम करीत असत. मात्र, रस्त्यांच्या रूंदीकरणात ही झाडे आता कालबाह्य झाली. परंतु, यंदाच्या उन्हाळ्यात मात्र शहर, उपनगरांतून प्रवास करताना वाहनचालकांना अशाच सावलीचा सुखद अनुभव येत आहे. पौड रस्त्यावरून जाणारे वाहनचालक मेट्रो पुलाजवळील रस्त्यावरून जात असताना सावलीतून प्रवास करण्याचा आनंद घेत आहे.
शहर, उपनगरांतून सध्या उन्हाचा चटका वाढत आहे. यामुळे दुपारी रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी असते. मात्र, कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या विशेषत: दुचाकी चालकांना भर उन्हाचा चटका सहन करत प्रवास करावा लागतो. हा प्रवास करताना सिग्नलची पडलेली छोटीसी सावलीही आधार वाटते.
परंतु, पौड रस्त्यावर नव्याने सुरू असलेल्या मेट्रो पुलाच्या कामामुळे या मार्गावर दुचाकी चालकांचा प्रवास सुखाचा ठरत आहे. कचरा डेपोपासून सुरू झालेली मेट्रो सध्या डेक्कन येथील गरवारे महाविद्यालयापर्यंत सुरू आहे. या मेट्रोच्या पुलामुळे पुलाखालील रस्त्यावर मोठी सावली पडते, त्यामुळे चालकांना जवळपास आठ ते दहा कि.मी.चा प्रवास सावलीतून करता येत आहे. पूर्वी पूल नसल्यामुळे रस्ते तापलेले असायचे. मात्र, मागील वर्षभरापासून मेट्रोच्या पुलामुळे पडणाऱ्या सावलीतून उन्हाळ्यात रस्ते थंड राहत आहेत, यातून पडलेल्या सावलीतून दुचाकी चालकांचा प्रवासांना सुखाचा होत आहे. शहर, उपनगरात ज्या-ज्या ठिकाणी मेट्रोच्या पुलाचे काम झाले आहे ते असा खुखद अनुभव दुचाकी चालक आणि पादचारी घेत आहेत.
पावसाळ्यातही ठरणार उपयोगी…
उन्हात पुलाची सावली रस्त्यावर पडत असल्याने या पुलाचा असाही उपयोग होत असताना पावसाळ्यातही या पुलाखाली थांबणे तसेच पुलाखालील रस्त्यावर वाहन चालवताना पाऊस तसा कमीच लागेल. मेट्रो स्टेशनचा परिसर तर दुचाकी चालक तसेच पादचाऱ्यांना सुरक्षितपणे थांबण्यासाठी मोठे उपयोगी ठरणार आहे.