बाजीराव रस्त्यावर पाणीपुरवठा विभागाचा कारभार
पुणे – जवळपास 45 वर्षे जुन्या ड्रेनेजलाइन आणि जलवाहिन्या बदलण्यासाठी महापालिकेकडून दोन वर्षांपासून टप्प्याटप्प्याने बाजीराव रस्त्याचे काम करण्यात येत होते. हा रस्ता पूर्ण करून अवघा महिनाभर झाला तसेच महापालिकेने अद्याप या कामाचे बीलही दिलेले नाही. असे, असतानाच बाजीराव रस्त्यावर हुजूरपागा शाळेच्या समोर मध्यभागीच रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे, काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता खोदण्यात आल्याने या रस्त्याचा दोषदायित्व कालावधी संपुष्टात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पथ विभागाने पाणी पुरवठा विभागाच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे.
काय घडला प्रकार…
महापालिकेकडून शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी काढण्यात आलेल्या निविदेनुसार, नुकतेच बाजीराव रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम केले आहे. या बाजीराव रस्त्यावर करोनाच्या लॉकडाऊनमध्ये जुन्या ड्रेनेजलाइन तसेच जलवाहिन्या बदलण्याचे काम अद्यापही सुरू होते. ते संपल्यानंतर हा रस्ता दुरूस्त करण्यात आला.
मात्र, दुरूस्तीनंतर, लगेचच या ठिकाणी जलवाहिनीला गळती असल्याने पाणी पुरवठा विभागाने रातोरात हा रस्ता खोदून गळती बंद केली. मात्र, यासाठी नवा कोरा रस्ता खोदावा लागला. परिणामी, हा रस्ता केल्यानंतर पुढील पाच वर्षे त्याचा दोष दायित्व कालावधी ठेकेदाराकडे असणार होते. मात्र, त्यासाठी, महापालिकेने अथवा कोणत्याही इतर कंपनीने खोदाई करू नये, असे बंधन होते. मात्र, पालिकेनेच रस्ता खोदल्याने ही अट ठेकेदावर लागू होणार नाही.
रस्ता नव्याने केलेला आहे. मात्र, कुठलीही पूर्वकल्पना न देताच खोदण्यात आला. याबाबत पाणी पुरवठा विभागाकडे विचारणा करण्यात आली आहे. त्यानुसार, संबंधितांवर कारवाई केली जाईल.
– व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभाग प्रमुख, मनपा