पुणे – जिल्ह्याचा निर्यात कृती आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच तो सादर केला जाईल. त्यातून प्रमुख उत्पादनांच्या निर्यातवृद्धीस चालना मिळणार असून, निर्यातदारांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर केले जात आहेत. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारी आग्रही आहे.
देशातील प्रत्येक जिल्ह्यांतील उत्पादन व सेवांच्या निर्यात क्षमता निश्चित केल्या जात आहेत. या उत्पादन व सेवांना सातासमुद्रापार पोहोचविण्यासाठी जिल्हा निर्यात कृती आराखडा तयार केला जात आहे. त्यात स्थानिक निर्यातदारांना गुणवत्तापूर्ण उत्पादन करण्यासाठी आणि परदेशातील संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात येत आहेत. त्यासाठी एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली निर्यात प्रोत्साहन समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती हा आराखडा तयार करत आहे.
हे होणार फायदे
उद्योजकता व रोजगार निर्यातीस चालना
गुंतवणूक आकर्षित करण्यास प्रोत्साहन
उत्पादनांची निर्यात
क्षमता निश्चित होणार
निर्यातवृद्धीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची गरज समजणार
जिल्ह्यातून निर्यात होणारी उत्पादने- इंजिनिरिंग उत्पादने, वाहने व संबंधित सुटे भाग, औषधे, साखर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, रसायने.
निर्यात करण्यात येणारे देश – अमेरिका, मेक्सिको, युनायटेड किंगडम, संयुक्त अरब अमिराती, जर्मनी, नेदरलॅंड, बांग्लादेश, चीन, ब्राझील.
संभाव्य प्रकल्प
या आराखड्यात पायाभूत प्रकल्पांच्या निर्मितीवर भर देण्यात येत आहे. मालवाहतुकीसाठी स्वतंत्र कॉरिडॉर, हे मार्ग पीएमआरडीएच्या नियोजित रिंगरोडशी जोडले जाणार आहेत. चाकण, तळेगाव व रांजणगाव परिसरात उन्नत रस्त्यांची उभारणी, निर्यातक्षम उद्योगांसाठी “एमआयडीसी’मध्ये भूखंड उपलब्धता, निर्यातक्षम उत्पादनांच्या गुणवत्तावाढीसाठी संशोधन सुविधा, वीज वितरण यंत्रणेचे आधुनिकीकरण, बॅंकांकडून त्वरित वित्तसाह्य आदी कामे केली जातील. त्यासाठी जबाबदाऱ्या निश्चित झाल्या आहेत.
पुणे जिल्ह्याच्या निर्यातभरारीसाठी चांगली व्यवस्था उभारण्यात हा आराखडा महत्त्वाची भूमिका बजावेल. आराखड्यात जिल्ह्यातून अधिकाधिक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आवश्यक जागतिक दर्जाचे संशोधन, मालवाहतुकीसाठी उत्तम रस्ते, अखंडित वीजपुरवठा, जागा व वित्तसाह्य आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
– पी. डी. रेंदाळकर, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र