पुणे – राज्यातील विविध गाव, शहर, तालुक्यांसह जिल्ह्यात असलेल्या जमिनींची सरकार दरबारी एकत्रित माहिती अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे वन, वक्फ, देवस्थान, भाडेपट्ट्याने यासारख्या विविध सोळा प्रकारच्या जमिनींची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यासाठी “रेव्हेन्यू रेकॉर्ड रजिस्ट्री फ्रेमवर्क’ हा राज्य शासनाच्या महसूल विभागाने प्रकल्प हाती घेतला आहे. यामुळे गावनिहाय प्रत्येक प्रकारच्या जमिनींची माहिती उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्रात तलाठी दफ्तर आहेत. प्रत्येक तहसीलमध्ये तलाठ्यांच्या आधारे तसेच त्यांच्या आधारे जिल्ह्यांचा अहवाल तयार केला जातो. राज्याचाही अहवाल तयार केला जातो. ही प्रक्रिया सध्या मानवी पद्धतीने तयार करण्यात येते. अहवालात तांत्रिक चुका होण्याची शक्यता असते. अहवाल अचूक आणि एकदाच देता यावा यासाठी “रेव्हेन्यू रेकॉर्ड रजिस्ट्री फ्रेमवर्क’ हा नवा प्रकल्प महसूल विभागाने हाती घेतला आहे. तलाठी दफ्तराची मंडलाधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच राज्य पातळ्यांवर माहिती एकत्र करता येणार आहे, अशी माहिती भूमि अभिलेख विभागाकडून देण्यात आली.
संगणक प्रणाली विकसित करणार…
जमिनींचे सध्या सोळा प्रकार आहेत. ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्यास जमिनींचे किती क्षेत्र आहे हे कळल्यास तेथे लक्ष ठेवणे आणि व्यवस्थापन होईल. वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये जमिनींच्या सत्ताप्रकारात बदल होतात. त्याची माहिती अद्ययावत होऊन ती सतत उपलब्ध व्हावी, यासाठी संगणक प्रणाली विकसित केली जाणार आहे. त्यातील बदल योग्य परवानगीनुसार झाले आहेत का किंवा त्याचे निरीक्षण करणे शक्य होणार आहे.