पुणे – महापालिकेच्या मिळकतकर आकारणीच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला असल्याचे कारण पुढे करत शहरातील तब्बल 186 मिळकतधारकांनी जवळपास 50 कोटींचा कर थकविला असल्याचे समोर आले आहे. महापालिकेकडून कर विभागाबाबत न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यांची तपासणी केल्यानंतर या दाव्यांमध्ये कुठेही कर वसुलीला स्थगिती दिली नसल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे, या मिळकतीं सील करण्याची तसेच थकबाकी वसुलीची मोहीम सुरू केली असून आतापर्यंत 4 कोटींची थकबाकी असलेली मिळकत सील केली आहे. यापुढेही मोहीम सुरूच राहील,अशी माहिती कर संकलन विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांनी दिली. दरम्यान, महापालिकाविरोधात वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये सुमारे 336 दावे सुरू असून त्यांची थकबाकी तब्बल 1600 कोटी रुपयांची आहे.
तर सुरू असलेले अनेक दावे 20 वर्षांपेक्षाही अधिक जुने आहेत. परिणामी या दाव्यांची सद्यस्थिती तसेच निकाल लागलेले दावे याची कोणीतीही ठोस माहिती प्रशासनाकडे नव्हती. त्यानंतर कर संकलन विभाग आणि विधी विभागाकडून संयुक्तपणे या दाव्यांची माहिती संकलित करून त्यांची तपासणी सुरू आहे. त्यात, करवसुलीला स्थगिती नसलेल्या मिळकती आढळून आल्या आल्याचे उपायुक्त देशमुख यांनी स्पष्ट केले.
विधी विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर तातडीनं त्यावर कार्यवाही सुरू करण्यात आली असून 4 कोटींची थकबाकी असलेल्या मिळकती सील केल्या आहेत. त्यामुळे, थकबाकीदारांनी पैसे भरून कारवाई टाळावी.
– अजित देशमुख, उपायुक्त, कर संकलन विभाग
मिळकतकराचे वेगवेगळ्या न्यायालयात दावे सुरू आहेत. त्याची तपासणी केली असता सुमारे 186 दाव्यात स्थगिती नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, महापालिका या मिळकतींवर कारवाई करू शकते.
– ऍड. निशा चव्हाण, मुख्य विधी अधिकारी
- मिळकतकराचे 336 दावे प्रलंबित
- 186 दाव्यात स्थगिती नसल्याचे उघड
- दाव्यात अडकला 1600 कोटी कर
- स्थगिती नसलेल्या मिळकती सील करणार