पुणे -महापालिकेच्या ऍमेनिटी स्पेस भाड्याने देण्यावरून भाजप आणि विरोधकांमध्ये राजकारण तापले आहे. त्यातच आता या 185 मधील तब्बल 74 जागा कोथरूड विधानसभा मतदारसंघातील आहेत, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने जागांच्या यादीचा हवाला देत केला आहे. तसेच राष्ट्रवादीने याप्रकरणी आता थेट आमदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे बोट दाखवण्यास सुरुवात केली आहे.
ऍमेनिटी स्पेसप्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील गप्प का? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि विशाल तांबे यांनी केला आहे. ताब्यातील 185 ऍमेनिटी स्पेस भाडेकराराने देण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने स्थायी समितीत ठेवला होता. या प्रस्तावास भाजपने बहुमताच्या जोरावर मान्यता देत त्यात आणखी 85 जागांची वाढ केली. त्यानंतर हा प्रस्ताव आता मुख्यसभेत मान्यतेसाठी असून त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीने भाजप प्रदेशाध्यक्षांकडेच बोट दाखवले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून ऍमेनिटी स्पेसबाबत विषय सुरू आहे. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातील सर्वाधिक जागा आहेत. त्यानंतरही ते या विषयावर काहीच बोलत नाहीत. त्यामुळे त्यांचा या विषयाला पाठिंबा आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. नेमक्या कोणाच्या घशात या जागा घालण्याचा घाट सुरू आहे, हे पुणेकरांना समजणे आवश्यक आहे.
– विशाल तांबे, शहर प्रवक्ते, राष्ट्रवादी कॉंग्रेस
ऍमेनिटी स्पेस भाड्याने देण्याच्या प्रकारास भाजप प्रदेशाध्यक्षांचा होकार असल्यानेच महापालिका पदाधिकाऱ्यांनी या जागा खासगी विकसकांच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्षांनी याबाबत आपली भूमिका पुणेकरांसमोर स्पष्ट करावी.
– प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आरोप हास्यास्पद आहेत. या जमिनी महापालिकेच्या ताब्यात 2017 पूर्वी आल्या आहेत. या जमिनींचे संरक्षण आतापर्यंत भाजपने केले असून, या जमिनी पुणेकरांच्या विकासासाठीच वापरल्या जाणार आहेत.
– गणेश बिडकर, सभागृह नेते, भाजप
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रसिद्धीसाठी खोटे आरोप करतात. शहराचा विचार केल्यास महापालिकेच्या शेकडो जागा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने ताब्यात घेतल्या आहेत. सार्वजनिक हिताच्या जागा बळकावल्या आहेत. त्यामुळे त्यांचे पाप लपवण्यासाठी हे आरोप केले जातात. त्यांनी लाटलेल्या जागांची यादी आम्ही लवकरच जाहीर करू.
– जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप