पालिका वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला लवकरच सुरुवात
वर्गखोल्या बांधण्याची निविदा स्थायीपुढे
पुणे – महापालिकेच्या नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय गेल्या दहा वर्षांपासून चर्चिला जात आहे. मात्र, आता त्याची प्रत्यक्ष मुहूर्तमेढ रोवली जाणार असून वर्गखोल्या बांधण्याची निविदा स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी आली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी वर्गखोल्या बांधणे आणि दुरूस्तीच्या निविदा मंगळवारच्या बैठकीमध्ये दाखल करून घेण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनामुळे मंगळवारी बैठक तहकूब करून गुरूवारी घेण्यात आली आहे. गुरूवारी होणाऱ्या बैठकीमध्ये या निविदांवर निर्णय होईल, असे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.
महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाला सुरूवात होणार आहे. पालिकेची आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या 20 एकर जागेवर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची संकल्पना तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दहावर्षांपूर्वीच मांडली होती.
अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूदही केली होती. त्यानंतर भाजप महापालिकेत सत्तेत आल्यानंतर पहिले स्थायी समिती अध्यक्ष आणि विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने या महाविद्यालयाची संकल्पना पुढे नेऊन राज्यसरकारकडेही पाठपुरावा केला.
दोन स्वतंत्र निविदा काढणार…
कायदेशीर तांत्रिक प्रक्रिया सुरू असताना डॉ. नायडू हॉस्पिटल सोबतच वर्गखोल्यांसाठी येथून जवळच असलेली महापालिकेची मंगळवार पेठेतील कै. बाबूराव सणस कन्याशाळा तसेच कमला नेहरू रुग्णालयातील जागाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रामुख्याने कन्याशाळेमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्या असतील. या शाळेत वैद्यकीय महाविद्यालयाच्या दृष्टीने आवश्यक नवीन वर्गखोल्या बांधण्याच्या तसेच जुन्या वर्गखोल्या दुरूस्तीच्या कामाची निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आली आहे.
नवीन वर्गखोल्या बांधणे आणि जुन्या वर्गखोल्या दुरूस्तींसाठी दोन स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या असून, कमी दराने आलेल्या सुमारे 1 कोटी 23 लाख रुपयांच्या कामाला लवकरच प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. एकप्रकारे महाविद्यालयाच्या कामाची मुहुर्तमेढ यानिमित्ताने रोवली जाणार आहे.