- हडपसर किरकोळ, महात्मा फुले मंडई सुरू
- या आठवड्यात मागणी वाढण्याची शक्यता
पुणे: मार्केट यार्ड सुरू होऊन एक आठवडा पूर्ण झाला. आता तरकारी विभागात शेतमालाची आवक वाढत आहे. मात्र, अद्याप अपेक्षित उठाव नाही. हळूहळू मालाला आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. शहरातील हडपसर मार्केट, महात्मा फुले मंडई हे अद्यापही सुरळीत सुरू झाले नाही. येत्या दिवसांत ते सुरळीत होऊन भाजीपाल्याला मागणी वाढेल, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले.
“निसर्ग’ चक्रीवादळामुळे पालेभाज्यांचे नुकसान झाले. रविवारी बाजारात कोथिंबीरीच्या 30 हजार जुडींची आवक झाली. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी वाढल्याने सर्व पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, खरेदीदार, आडतदार यामध्ये भीतीचे वातावरण असल्याने गेल्या आठवड्यात आवक कमी झाली. मात्र, शहरातील बहुतांश भाग सुरू झाल्याने येत्या आठवड्यात बाजार सुरळीत होईल. मागील रविवारी 3 ट्रक कांद्याची आवक झाली. ती 35 ते 40 टेम्पो इतकी झाली. जवळपास 70 टक्के कांदा दक्षिणेकडील राज्यांमधून खरेदी करण्यात येतो.