पुणे – करोनाची चौथी लाट आली, तरी ती ठराविक विभागापुरती असेल असे वाटते. बहुतांश वर्गाचे लसीकरण झालेले असल्याने, गंभीर परिणाम न होता ते अत्यल्प राहतील. तरीही नवा व्हेरियंट आला तर तो ठराविक भागापुरता (एन्डेमिक) मर्यादित असू शकेल, असे मत “इंडियन मेडिकल असोसिएशन’चे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे.
करोनाच्या चौथी लाट जून किंवा जुलैमध्ये येण्याविषयीचे भाकीत नुकतेच आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी केले आहे. तिसरी लाट आता पूर्णपणे ओसरली आहे, असे सध्या म्हटले जात असले, तरी एखादा नवा व्हेरियंट आला तरच चौथी लाट येईल.
किंवा ओमायक्रॉनमध्ये व्हेरिएशन होऊन चौथी लाट येण्याची शक्यता आहे, असा एक मतप्रवाह अभ्यासकांनी मांडला आहे.
कानपूर आयआयटीने जे संशोधन मांडले आहे, ते तिन्ही लाटांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या संशोधनातील सांख्यिकी प्रारूप मांडले आहे. त्यातूनही आता करोना जो पसरत आहे, तोही सार्वजनिक ठिकाणी निर्बंध न पाळणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कमी होणे हेच प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राज्यात सद्यस्थिती पाहता, बऱ्याच अंशी करोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस दिला जात आहे.
लसीकरण आवश्यकच
करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याला लसीकरण हे प्रामुख्याने कारणीभूत आहे. त्यामुळे लोकांच्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढत आहे. ठराविक कालावधीनंतर अँटीबॉडीज कमी होतात म्हणून बुस्टर डोस दिला जात आहे. अद्याप दोन ते 15 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले नाही, मात्र तेही झाले तर या रोगाचा प्रतिकार पूर्ण ताकदीने करू शकू, असे तज्ज्ञ सांगत आहेत.