पुणे – नळस्टॉप येथे शहरातील पहिला दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण रविवारी सायंकाळी 6 वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यामुळे सदैव वर्दळीचा कर्वे रस्ता आता वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
महामेट्रोकडून हा पूल महापालिकेच्या ताब्यात आल्यावर विद्युत व्यवस्थेचेही काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या पुलामुळे पश्चिम पुण्याच्या वाहतुकीला वेग येणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आधी स्थायी समिती अध्यक्षपदाची सूत्रे असताना 2017-18 अंदाजपत्रकात या उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यास निधी उपलब्ध करुन दिला होता. वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग प्रस्तावित झाल्यावर नळस्टॉप येथे दुमजली पूल साकारण्यासाठी मोहोळ यांनी पाठपुरावा करत तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन केले होते. जयपूर येथील उड्डाणपुलाच्या पार्श्वभूमीवर ही संकल्पना महापौर मोहोळ यांनी मांडली होती.
नळस्टॉप परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरून दर तासाला 35 ते 40 हजार वाहने जा-ये करत असल्याची नोंद होती. त्यामुळे या भागात तातडीने उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. पुण्यातील हा पहिलाच दुमजली उड्डाणपूल आहे. दरम्यान, यासोबतच कोथरूड येथील साकारण्यात आलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यानाचेही लोकार्पण येत्या रविवारी फडणवीस यांच्या हस्ते आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.
असा आहे पूल
पुलाची एकूण लांबी 550 मीटर
पुलावरून 4 पदरी वाहतूक होणार
पहिल्या मजल्यावरून वाहने,
दुसऱ्या मजल्यावर मेट्रो
मेट्रो आणि महापालिकेचा संयुक्त प्रकल्प