पुणे -घटस्फोट झालेला नसतानाही गुपचूप दुसरा संसार सुरू करणाऱ्या पतीला न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पद्माकर जोंधळे यांनी हा निकाल दिला. विशेष म्हणजे पहिल्या पत्नीबरोबर आपले लग्नच झाले नाही, असा बनाव पतीने न्यायालयात केला होता.
माधव आणि माधवी यांचे नोव्हेंबर 2001 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांनी माधव याने माधवी यांना विविध कारणांवरून त्रास देण्यास सुरुवात केली. वाद मिटत नसल्याने त्यांनी एप्रिल 2005 साली कौटुंबिक न्यायालयात संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल केला.
मात्र, त्यावर निकाल होण्यापूर्वीच माधव याने जुलै 2005 रोजी स्नेहल यांच्याशी (सर्व नावे बदललेली) लग्न केले. त्यामुळे पत्नी जिवंत असतानाही दुसरे लग्न केले म्हणून माधवी यांनी माधव आणि स्नेहल विरोधात ऍड. मानसी जोशी यांच्यामार्फत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता.