पुणे – सकाळी लवकर जाऊन करोना चाचणी केंद्रांवर दोन तास उभे राहून स्वॅब देण्याची आता गरज उरली नाही. घरच्याघरी स्वत:च स्वॅब घेऊन करोना चाचणी करता येणारे किट उपलब्ध झाले आहे. “मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स’ने “कोविसेल्फ’ नावाने या चाचणी संचाची निर्मिती केली आहे.
स्वदेशी “आरटी-पीसीआर’ टेस्ट किट असेही त्याला म्हणता येईल. याला “भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’नेही (आयसीएमआर) मान्यता दिली आहे. त्यामुळे करोनाची लक्षणे दिसली की, कोठेही केंद्रांवर न जाता घरातच या किटच्या सहाय्याने चाचणी करता येणार आहे. या किटमुळे काही मिनिटांतच “निष्कर्ष’ मिळणार आहे. यामुळे वेळही वाचणार आहे.
“या किटमुळे हजारो स्वॅब तपासणीचा सरकारी यंत्रणांवरील ताण कमी होणार आहे. तसेच देशाची गरज ओळखून आम्ही संशोधनातून हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे,’ असे “मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स’चे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ यांनी सांगितले.
असे वापरायचे किट
हे किट कसे वापरायचे याचे माहितीपत्रक, स्वॅब टेस्टसाठी लागणारे साहित्य, स्वॅब घेतल्यानंतर ते ज्या द्रावणात बुडवायचे आहे ते. त्यानंतर स्ट्रीप्सच्या सहाय्याने चाचणी कशी करावी, याचे मार्गदर्शन प्रत्येक किटसोबतच्या माहितीपत्रकात करण्यात आले आहे. चाचणीचा निकाल कळवण्यासाठी प्रत्येक संच मोबाइल ऍप्लिकेशनही जोडला गेला आहे. त्यावरील कोड स्कॅन करून चाचणीचा निकाल भरून तो “आयसीएमआर’ला कळवावा लागणार आहे. त्यातून पॉझिटिव्ह, निगेटिव्हचा डाटा सरकारकडे उपलब्ध होणार आहे.
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मेडिकलमध्ये हा संच सहजगत्या मिळू शकतो. तसेच तो ऑनलाइन पद्धतीनेही मागवता येऊ शकणार आहे. सध्या भारतात या संचाची किंमत
250 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
सुजित जैन,मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स
टेस्ट किटसाठी “आयसीएमआर’च्या सूचना
या टेस्टविषयी “आयसीएमआर’ने निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, “करोनाची लक्षणे असलेले आणि त्या संशयित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांनीच ही चाचणी करावी. गरज नसताना चाचणी करू नये. उत्पादक कंपनीने केलेल्या सूचनांनुसार घरी चाचणी करावी. त्यासाठी त्यांचे मोबाइल ऍप डाऊनलोड करावे.
वापरकर्त्यांनी चाचणी केल्यानंतर वापरलेल्या स्ट्रीपचा फोटो काढावा. चाचणीच्या निदानानुसार त्याची पाठवलेली माहिती “आयसीएमआर’ पोर्टलला सेव्ह केली जाईल. मात्र, लक्षणे आहेत आणि ही चाचणी “निगेटिव्ह’आली, तर त्यांनी स्वॅब कलेक्शन केंद्रावर जाऊन “आरटी-पीसीआर’ चाचणी करणे आवश्यक आहे.