पुणे – पंतप्रधान आवास योजनेच्या कामाला खराडीत सुरुवात

पुणे – पंतप्रधान आवास योजनेतील आठशे घरांचे काम खराडीत सुरू झाले असून अन्य ठिकाणची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. हडपसर, वडगाव, कोंढवा आणि बाणेरमध्ये प्रत्येकी दोन ठिकाणी ही योजना होणार आहे.

महापालिकेने पंतप्रधान योजनेच्या कामाला सुरुवात केली आहे. खराडी येथील जागा ताब्यात असल्याने तेथे आठशे घरांचे काम सुरू झाले आहे. हडपसर येथे अद्याप वर्कऑर्डर मिळाली नाही त्यामुळे तेथील काम सुरू झाले नाही. याशिवाय वडगाव येथील प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने तेथील कामही अद्याप सुरू करण्यात आले नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. हडपसर येथे 350 घरांचा प्रस्ताव आहे. वडगाव येथे 1150 घरांचा प्रस्ताव आहे. या दोन ठिकाणच्या जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. मात्र, कोंढवा आणि बाणेर येथील जागा अद्याप ताब्यात आल्या नाहीत.

बाणेर आणि कोंढवा येथे प्रत्येकी दोन ठिकाणी होणारे प्रकल्प आरक्षित जागेवरच होणार आहेत. त्यामुळे आरक्षित जागा मालकांच्या ताब्यातून घेण्यात आल्या नाहीत. ती प्रक्रिया पूर्ण करूनच प्रकल्प कार्यान्वित करता येणार आहे. या जागांच्या मोबदल्यात टीडीआर देऊन ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. भूसंपादनाच्या सगळ्या प्रक्रिया एकावेळीच सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.