पुणे – महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी आपला मोर्चा थकबाकीदारांकडे वळवला असून, गेल्या दीड महिन्यांत मिळकतकर विभागाने शहरातील 787 मिळकतींना सील करण्यात आले आहे. या मिळकतींची थकबाकी सुमारे 55 कोटी रुपयांची आहे. तसेच नागरिकांची सवलतीत कर भरण्याची मुदत संपल्यानंतर ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे.
एका बाजूला शहरातील सर्व निवासी मिळकतींना सरसकट 40 टक्के सवलत देण्यात आल्यानंतरही पुणेकरांकडून महापालिकेस अपेक्षित असलेला कर भरला जात नसल्याचे चित्र आहे. मिळकतकराची थकबाकी तब्बल दहा हजार कोटींच्यावर गेली आहे.
तर जवळपास साडेचार लाखांपेक्षा अधिक मिळकतींची ही थकबाकी आहे. त्यात अनेक जण न्यायालयात गेले असून, अनेक जणांनी कोणतेही न्यायालयीन दावे नसताना कर भरत नाहीत.
त्यातील अनेक थकबाकीदार अभय योजनेची वाट पाहत कर भरत नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून अशा मिळकतींची माहिती काढलेली असून, त्यांच्याकडे थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. पुढील महिन्यापासून दिवसाला 50 मिळकती सील करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.