सिंहगड रस्ता -वडगाव बुद्रुक भागात महापालिका संचलित शाळा क्र.203 बालवाडीतील अस्वच्छतेबाबत महापालिकेचे दुर्लक्ष असल्याचे तसेच क्षेत्रीय कार्यालयातून सफाई कर्मचारीच येथे येत नसल्याने शाळेतील स्वच्छतागृहाची सफाई शिक्षकांनाच करावी लागत असल्याचे वृत्त “प्रभात’ने (दि.14) दिले होते. याची गंभीर दखल घेत सहाय्यक आयुक्तांनी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची या प्रकरणी खरडपट्टी काढली, त्यानंतर संबंधीतांचीं मोठी धावपळ उडाली. आज, सकाळी शाळा परिसर तसेच स्वच्छतागृहाच्या सफाई करता स्वच्छता कर्मचारी तातडीने पाठविण्यात आला.
या शाळेत सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेत असून तीन शिक्षिका आणि दोन सेविका कार्यरत आहेत. तर, शाळा सफाई तसेच स्वच्छतागृहाच्या सफाई कामासाठी क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्याच नेमणूक करण्यात आली आहे. परंतु, सदर कर्मचारी शाळेकडे येत नसल्याने हे काम शिक्षकांनाच करावे लागत होते. यातून बराच वेळ सफाई कामात जात असल्याने ज्ञानदानास कमी वेळ मिळत होता.
याबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले होते, त्यांच्याकडूनही महापालिका प्रशासनास सदर बाब निदर्शनास आणून देण्यात आली होती. परंतु, याकडे दुर्लक्ष होत होते. अखेर, या शाळेतील वास्तव “प्रभात’ने वृत्तात मांडले, त्यानंतर संबंधीत अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
शाळेतील स्वच्छतागृहाची सफाई होत नसल्याबाबत तसेच पाण्याची टाकी द्यावी, अशी मागणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदनाद्वारे करणार आहे. तत्पूर्वीच “प्रभात’च्या वृत्ताची दखल घेण्यात आली. याबाबत समाधान आहे, असे माजी नगरसेवक हरिदास चरवड म्हणाले.