पिंपरी – लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाय योजना कराव्यात, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
लम्पी हा प्रामुख्याने मोठ्या जनावरांमध्ये आढळून येणारा आणि जलदगतीने प्रसारित होणारा विषाणूजन्य चर्म रोग आहे. या आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्य शासनाच्या पशू संवर्धन विभागाच्या सहकार्याने महापालिकेच्या वतीने उपाय योजना करण्यात येत आहे. या कामकाज नियोजनाचा आढावा आज आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत आज बैठक पार पडलेल्या या बैठकीस पशुवैद्यकीय विभागाचे उपआयुक्त संदिप खोत, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, विशेष अधिकारी किरण गायकवाड तसेच संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
लम्पीचा संसर्ग रोखण्यासाठी जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करणे, शहरातील विविध भागात धुरीकरण करणे, आजाराची लक्षणे आढळून आलेल्या जनावरांवर तात्काळ वैद्यकीय उपचार करणे, आदी सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी दिल्या.